'त्या' प्रकरणी तेजस्विनी पंडितवर कारवाई; कोंबडं झाकल्याने सूर्य..., अभिनेत्रीचा निशाणा
टोल दरवाढीवरुन मनसे पक्ष आक्रमक झाला आहे. अशातच, अभिनेत्री तेजस्विनी पंडितने थेट देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ ट्विट करत निशाणा साधला होता. या ट्विटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर आता ट्विटर अकाउंटवरील व्हेरीफेकीशनची ब्लू टिक काढण्यात आली आहे. यावरुन तेजस्विनीने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. कोंबडं झाकल्याने सूर्य उगवायचा राहत नाही, असा टोला तिने लगावला आहे.
काय आहे तेजस्विनी पंडित पोस्ट?
माझ्या X (ट्विटर) अकाऊंटचं व्हेरिफिकेशन काही लोकांनी माझं स्पष्ट मत सहन न झाल्याने राजकीय दबाव टाकून काढून टाकण्यास सांगितलं, कारण का तर मी एक ‘आम्हा जनतेची' इतकी वर्ष फसवणूक झाली असा वाटणारा प्रश्न उपस्थित केला म्हणून? X (टूट्विटर ) अकाउंटचा व्हेरिफिकेशन बॅच हा सन्मान असेल तर तो योग्य कारणासाठी जाणं, हा त्याहून मोठा सन्मान मला दिलात त्याबद्दल धन्यवाद, असा टोला तेजस्विनीने लगावला आहे. पण ह्या बंदीने माझा काय किंवा सामान्य माणसांच्या मनातील आक्रोश कमी होणार नाही.
सामान्यांचा आवाज बंद करणे हाच ह्यांचा बहुदा एकमात्र 'X' फॅक्टर आहे हे मात्र स्पष्ट होत जाईल. असो, माझा ‘जय हिंद जय महाराष्ट्र' साठीचा घोष योग्य वेळी सुरूच राहील. सत्तेत कोणीका बसेना, आम्ही जनता आहोत ! जेंव्हा जेंव्हा आमची पिळवणूक होईल, दिशाभूल होईल, तेव्हा तेव्हा आमचा आवाज दुमदूमणारच आहे, असेही तिने म्हंटले आहे.
दरम्यान, तेजस्विनीनं याआधी देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये देवेंद्र फडणवीस हे टोलच्या मुद्द्याबाबत बोलत आहेत. यात फडणवीस राज्यातील सगळ्या टोलवर आम्ही छोट्या गाड्यांना टोल मुक्ती दिली आहे, असे म्हणत आहेत. यासोबत तेजस्विनीने कॅप्शनमध्ये म्हंटले की, मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून, असे तिने लिहीले होते.