Tejashri Pradhan : तेजश्री प्रधानने ट्रोलर्सना उत्तर देत म्हणाली...आमच्याबद्दल बोलायचंय? बोला
आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधानने माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने निर्मित 'पंचक' या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. 'पंचक' चित्रपटात तेजश्री प्रधानच्या कामाचं कौतुक होत आहे. नुकताच मिरची मराठी या रेडिओ चॅनेलला तेजश्रीने मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये तेजश्रीने ट्रोलर्सबद्दल वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही, तर यावेळी तेजश्रीने ट्रोलर्सना अनोख्या अंदाजमध्येदेखील उत्तर दिलं आहे.
मिरची मराठी या रेडियो चॅनेलला मुलाखत देताना तेजश्रीला जेव्हा प्रश्न विचारण्यात आलं 'तू यशाकडे कशी बघते?' तेव्हा तेजश्री म्हणाली, 'मी यशाकडे असं बघते की माझ्या कालच्या व्हर्जनपेक्षा माझं आजचं व्हर्जन चांगलं आहे का? आज जो दिवस मी घालवला आहे, तो घालवल्यानंतर मला रात्री समाधानाची झोप जर लागली असेल तर त्या दिवशी मी यशस्वी झाले. याच्या पलीकडे यश काही नसतं. हे मृगजळ आहे. मी टेलीव्हिजन आज एवढी वर्ष करतेय. टेलीव्हिजनचे माझे साडेतीन, चार हजार भाग करून झाले असतील. पण तरीही ज्या दिवशी माझा शो संपतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आजही मला लोक विसरतात. आणि माझा नवीन शो सुरू झाल्यानंतर पुन्हा मला ते नव्याने डोक्यावर घेतात. त्यामुळे हे मृगजळ आहे'.
'जोपर्यंत तुम्ही दिसता, तोपर्यंत तुम्ही आहात. ज्या दिवशी तुम्ही दिसायचे बंद होणार आहात, त्यादिवशी काही नसणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रवासाकडे लक्ष द्या. कारण तो प्रवास हा तुमचा असतो. तो इतरांचा प्रवास नसतो. तुम्ही कुठल्याही लांबच्या प्रवासाला निघाल्यानंतर जसं की, गोव्याला निघाल्यावर दोन्ही बाजूला झाडं दिसतात. ते दृश्य बघायला छान वाटतं. पण ते दृश्य बघून व्हायच्या आत मागे निघूनही जातं. तुमच्याबरोबर काहीच राहत नाही. तो एक प्रवास आहे. जो चालूच आहे आणि चालूच राहणार आहे. त्यामुळे याकाळात लोक येतील तुमचं कौतुक करतील, ट्रोल करतील पण ते कायम नसतं. त्यामुळे तुम्ही फक्त तुमच्या प्रवासावर लक्ष द्या', असं म्हणत तेजश्री प्रधानने ट्रोलर्सना उत्तर दिली होती.
अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'पंचक' चित्रपटाच्या निमित्ताने 'मिरची मराठी' रेडियो चॅनेलला मुलाखत दिली होती. यादरम्यान तेजश्रीने आपल्या प्रेक्षकांना सल्लादेखील दिला होता.