सिव्हील इंजीनिअरपासून आता रीलस्टार; कसा झाला बहूचर्चित मंगाजींचा प्रवास?
मंगेश काकड उर्फ मंगाजी हा इन्स्टाग्रामवरील कंटेंट क्रीएटर. मंगेश ह्या नावाने जरी लोक ह्याला ओळखत नसले तरी, मंगाजी हे नाव इन्स्टाग्राम वापरणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाने इन्स्टाग्राम फीडमध्ये एकदातरी नक्की पाहिलं असणार.
मंगेशची पार्श्वभूमी पाहिली तर, मंगेश हा शेतकरी कुटूंबातील मुलगा. त्याने सिव्हील इंजीनिअरींग मध्ये पदवी मिळवली व त्यानंतर काही काळ नोकरी देखील केली. परंतू, नाटकाची ओढ व अभिनयाप्रती असलेली तळमळ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्याने 2019 च्या शेवटी नोकरी सोडली व अभिनय क्षेत्रात करीअर बनवायचं असं त्याने ठरवलं परंतू, नोकरी सोडल्यानंतर काहीच दिवसात कोरोनाचं संकट पसरलं. त्यामुळे, नोकरीही गेली होती व अभिनय क्षेत्रात करीअर करण्यासाठीचे पर्यायही फार कमी दिसत असल्याने मग त्याने घरातल्यांना शेतीमध्ये जमेल तितकी मदत करत-करत सोशल मीडियावर आपल्या अभिनयाचे काही विडीओज् पोस्ट करायला सुरूवात केली. ह्या व्हिडीओजमध्ये पाटील नावाचं पात्र हे मंगेशच्या आजोबांपासून प्रेरीत झालेलं असून हे पात्र त्याच्या सर्वात लोकप्रीय पात्रांपैकी एक आहे.
केवळ सोशल मीडियावर कंटेंट बनवता यावा ह्याकरीता आपलं शिक्षण किंवा नोकरी सोडणाऱ्यांना त्याने तसं न करण्याचा सल्ला दिलाय. जर एखाद्या क्षेत्रात काम करण्यासाठी तुम्ही तुमचं शिक्षण किंवा नोकरी सोडताय त्या क्षेत्रातील तुमचं काम केवळ सोशल मीडिया पुरतं मर्यादित न ठेवता सर्व ठिकाणी त्या क्षेत्रात काम मिळविण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असायला हवं असं त्याचं मत आहे.
सध्या मंगेशचे इन्स्टाग्रामवर लाखोंच्या घरात चाहते असुन तो महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रीय कंटेंट क्रीएटर्स पैकी एक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. सध्या मंगेश इन्स्टाग्रामवर व्हिडीओज बनविण्यासोबतच नाटकातही काम करतो. अजून खूप यश संपादन करायचं आहे व ते मी नक्की करेन असा त्याचा आत्मविश्वास आहे.