Shaktimaan Mukesh Khanna: आजच्या मुलांना अंधारातून बाहेर काढण्यासाठी तो येतोय! शक्तीमानचा दमदार कमबॅक
ज्याप्रकारे आताच्या मुलांचे सुपरहिरो हे परदेशातील वेबसीरिज किंवा चित्रपटातील मार्व्हल, एव्हेंजेर्स तसेच सुपरमॅन इत्यादी आहेत त्याचप्रमाणे ९० च्या दशकातील मुलांसाठी भारतातील पहिला सुपरहिरो हा शक्तिमान होता. तेव्हाच्या काळी सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणून शक्तिमान या मालिकेला ओळखलं जायचं. मुलं शाळेतून आले की पहिला टीव्हीसमोर बसून ही मालिका पाहायचे. भारताचा पहिला सुपरहिरो म्हणून या मालिकेतील शक्तिमान ही भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांना पाहिलं जायचं. शक्तिमान ही मालिका १९९७ मध्ये सुरु झाली आणि आठ वर्षे चाललेली. या मालिकेचे ४५० एपिसोड्स प्रेक्षकांना पाहायला मिळाले. या शोमध्ये मुकेश खन्ना यांच्याबरोबर किटू गिडवानी, वैष्णवी, सुरेंद्र पाल व टॉम ऑल्टर यांसारखे कलाकार होते.
आता पुन्हा एकदा भारताचा पहिला सुपरहिरो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुकेश खन्ना यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शक्तीमानच्या वेषात एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी कॅप्शन देत म्हंटलं आहे की, "त्याला परत येण्याची वेळ आली आहे. आमचे पहिले भारतीय सुपर टीचर- सुपर हिरो. होय! आजच्या मुलांवर अंधार आणि वाईटाचा प्रभाव आहे म्हणून… त्याच्यासाठी परत येण्याची वेळ आली आहे. तो मेसेज घेऊन परततो. तो शिकवणी घेऊन परततो आजच्या पिढीसाठी. त्याचे स्वागत करा. दोन्ही हातांनी !!!!!"
रणवीर सिंगला शक्तीमान भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा
शक्तीमानची घोषणा झाली त्यावेळेस अशी चर्चा सुरु होती की, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग शक्तीमान ही भूमिका साकारणार आहे. एका मुलाखती दरम्यान मुकेश खन्ना म्हणाले होते की, रणवीर सिंहने त्याला शक्तिमानची भूमिका साकारण्याची संधी मिळावी यासाठी त्याने सांगितले होते. मी रणवीरचं त्याच्या अभिनयावरुन कौतुक देखील केल होत. पण मी रणवीरला शक्तिमान म्हणून मान्यता दिलेली नव्हती. त्यांनी सांगितले की, मी यादरम्यान एक व्हिडियो देखील सोशल मीडियावर पोस्ट केला होता ज्यामध्ये त्यांनी रणवीरला या भूमिकेबद्दल नकार दिला असल्याचं देखील स्पष्ट केलं होत.
बालपणीच्या आठवणींना पुन्हा उजाळा
तर आता शक्तीमानला पुन्हा येताना पाहून चाहत्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा आला आहे. चाहत्यांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत आपल्या लहानपणीच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत तर त्यांना पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याबाबत शुभेच्छा देत त्यांचं कौतुक देखील केलं आहे. तर कमेंटद्वारे चाहते म्हणाले की, "मला लहानपणी शक्तीमानचा ड्रेस विकत घ्यायचा होता! पण दुर्दैवाने ते मिळाले नाही!, व्वा खूप वाट पाहत आहे सर, माझा आवडता शो शक्तीमान, ९० च्या दशकातील मुलांनाच या सुपर हिरोची किंमत कळते, पहिल्या भारतीय सुपर हिरो शक्तीमानचे परत स्वागत आहे, खूप खूप छान स्वागत शक्तीमान, आमचा बालपणीचा सुपरहिरो," या कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.