Scam 2003 Teaser: तेलगी घोटाळ्यावरील 'स्कॅम 2003' चा टीझर पाहिलात का?
निर्माते हंसल मेहतांची वेब सीरिज स्कॅम 1992 प्रचंड गाजली होती. या सीरिजमध्ये भारतातील सर्वात मोठा तेलगी स्कॅम दाखवण्यात आला होता. आता या सीरिजचा पुढचा भाग स्कॅम 2003 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरिजच्या या दुसऱ्या सिझनचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.
हंसल मेहता दिग्दर्शित ‘स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी’ या वेब सीरिजने 2020 मध्ये धुमाकूळ घातला होता. प्रतीक गांधीची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजमध्ये ‘बिग बुल’ हर्षद मेहताची कथा दाखवण्यात आली होती आणि त्याला जगभरातून दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता तीन वर्षांनंतर हंसल मेहता एका नव्या स्कॅमची कथा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘स्कॅम 2003 : द तेलगी स्टोरी’ या आगामी सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अब्दुल करीम तेलगी याच्या आयुष्यावर आधारित ही सीरिज आहे. तेलगीने तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा स्टँप पेपर घोटाळा केला होता.
त्यात अब्दुल करीम तेलगीने कशा पद्धतीने खोटेपणा आणि फसवणुकीच्या जोरावर त्याचं साम्राज्य निर्माण केलं, याची झलक पहायला मिळते. ‘स्कॅम 2003’ ही देशातील सर्वात मोठा स्टॅम्प घोटाळ्यावर आधारित वेब सिरीज असणार आहे. देशात त्याकाळी इतका मोठा स्टॅम्प घोटाळा झाला होता की, त्याचा अंदाज लावणे देखील कठीण आहे. सोबतच पुढे “पैसा कमाया नहीं, बनाया जाता है” आणि “लाइफ में आगे बढना है तो साहस तो करना पडेगा ना डार्लिंग” अशा आशयाचे देखील डायलॉग्स ऐकायला मिळतात. शेअर केलेल्या टीझरमध्ये अनेक युजर्स ‘रिस्क है तो इश्क है’ या डॉयलॉगप्रमाणेच ‘स्कॅम 2003’ मधले हे डायलॉगही चांगलेच व्हायरल होतील, असे अनेक नेटकऱ्यांचे मत आहे.
2 सप्टेंबर 2023 ला ही वेबसीरिज ‘सोनी लीव्ह’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अभिनेता गगन देव या वेब सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार असून या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा हंसल मेहता आणि तुषार हिरनंदानी यांच्याकडे आहे.