संजय लीला भन्साळीचा 'हिरामंडी'चा फर्स्ट लूक रिलीज
संजय लीला भन्साळी पडद्यावर अविश्वसनीय जग निर्माण करतात. चित्रपटांमध्ये भन्साळीची भव्य शैली आणि त्या कालखंडातील कथांमधील त्यांचे बारीकसारीक तपशील वाखाणण्यासारखे असतात. अशातच आता संजय लीला भन्साळींनी 'हिरमंडी' या वेबसिरीजची घोषणा केली. तेव्हापासून रसिक प्रेक्षकांना याची खूप उत्सुकता लागली होती. अखेर नेटफ्लिक्सने आज 'हिरामंडी'चा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
'हिरामंडी'चा फर्स्ट लूकमध्ये 'संजय लीला भन्साळी तुम्हाला त्या जगात आमंत्रित करत आहेत जिथे गणिका राणी होत्या, असे लिहीले आहे. भन्साळीचा हा नेटफ्लिक्स शो तीन वेगवेगळ्या पिढ्यांच्या वेश्यांची कहाणी आहे. हिरामंडी हे लाहोरमधील एका क्षेत्राचे नाव आहे जे मुघल काळात गणिकांसाठी ओळखले जात होते, अशी माहिती समोर येत आहे.
अदिती राव हैदरी, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, मनीषा कोईराला आणि शर्मीन सहगल 'हिरामंडी'मध्ये मोठ्या भूमिकेत दिसणार आहेत. फर्स्ट लूक व्हिडिओमध्ये, सर्व अभिनेत्री पारंपारिक शैलीत अतिशय सुंदर सोनेरी पोशाख परिधान केलेल्या दिसत आहेत. याशिवाय, शोची कास्टिंग रिलीज डेट किंवा इतर तपशील फर्स्ट लूकमध्ये शेअर केलेले नाहीत. पण हा शो 'लवकरच' येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
संजय लीला भन्साळी यांचा 'हिरामंडी; त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगितले जात आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील प्रेम, फसवणूकीचे राजकारण आणि तवायफ संस्कृतीची कथा या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. भन्साळी हे पीरियड फिल्म्सच्या क्षेत्रात मास्टर मानले जातात. यामुळेच त्यांच्या या वेबसिरीजकडूनही लोकांना मोठ्या अपेक्षा आहेत.