Sameer Wankhede : मादक पदार्थ सेवनाने युवापिढी व समाजाचे नव्हे तर देशाचे नुकसान होतयं
अभिजीत हिरे | मुंबई : भिवंडीतील श्री इंद्रपाल बाबुराव चौघुले विधी महाविद्यालय या ठिकाणी मुंबई येथील आत्मसन्मान मंच या संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सभेचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या ठिकाणी महिलांना सन्मानाने काम करण्याचा अधिकार, समस्या व आव्हाने या विषयावर आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना समीर वानखेडे यांनी उत्तरे देऊन त्यांचे समाधान केले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना समीर वानखेडे यांनी मादक पदार्थांच्या सेवनामुळे व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन फक्त युवा पिढी व समाजाचे नुकसान होत नाही तर देशाचं फार मोठं नुकसान होतं आहे. कारण या मादक पदार्थाच्या व्यवसायातील अनिर्बंध पैसा हा देशविघातक कारवाया करण्यासाठी अतिरेकी संस्थांच्या हातून वापरला जातो आणि त्यासाठी मादक पदार्थांच्या व्यसनापासून युवा वर्गाने दूर राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन समीर वानखेडे यांनी केले आहे.
तर शाहरुख खान यांच्या जवान या चित्रपटाच्या प्रमोशन संदर्भात समीर वानखेडे यांना विचारले असता कोणता चित्रपट? कोण हिरो? मी कोणाला ओळखत नाही असं सांगत ज्यांचा आदर्श भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांना कोणत्या हिरोची गरज नाही, असे विधान केले आहे .
दरम्यान, अभिनेता शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचा ट्रेलर प्रसिद्ध झाला. या ट्रेलरमधील एका डायलॉगची सध्या सर्वत्र चर्चा आहे. बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर, हा डायलॉग ऐकून अनेकांना एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची आठवण झाली.