Ruturaj Wankhede won Filmfare award
Ruturaj Wankhede won Filmfare awardTeam Lokshahi

आयुष्यातला पहिला फिल्मफेअर पुरस्कार आहे खास…! - ऋतुराज वानखेडे

Published by :
Vikrant Shinde
Published on

लॉकडाऊन नंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट "जयंती" (Jayanti Film) प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवून गेला. सदर सिनेमा चित्रपटगृहात तब्बल १० आठवडे चालला. सिनेमाचा एकंदर विषय, गाणी तसेच अभिनय या बळावर प्रेक्षकवर्ग या सिनेमाकडे खेचला गेला. रसिक प्रेक्षकांसोबतच जयंतीने समीक्षकांचीदेखील मने जिंकली आणि याचाच परिणाम म्हणून यंदाच्या मराठी फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये (Filmfare Award) जयंतीचा समावेश झाला. सिनेमामध्ये "संत्या"च्या मुख्य भूमिकेत असलेला ऋतुराज वानखेडे (Ruturaj Wankhede हा "सर्वोकृष्ट अभिनेता (पदार्पण)" या पुरस्काराने सन्मानित झाला आहे.

कोरोनामुळे मागील २ वर्ष रखडलेले काही मानाचे पुरस्कार सोहळे यंदा पार पडले. यात सर्वात प्रतिष्ठित असलेला "मराठी फिल्मफेअर पुरस्कार" हा सोहळा हल्लीच पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्व कलाकार मंडळींनी यावेळी हजेरी लावली होती. जयंती सिनेमाला फिल्मफेअर पुरस्कारांची ५ नामांकने मिळाली होती त्यातील पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ऋतुराजला मिळाला असून त्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जयंती सिनेमाला हा पहिलाच पुरस्कार प्रदान झाल्या कारणाने चित्रपटाच्या संपूर्ण टीमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ऋतुराज वानखेडे हा नागपूर स्थित अभिनेता असून त्याने अनेक नाटकं गाजवली आहे परंतु, जयंती हा त्याचा पहिलाच चित्रपट असल्या कारणाने त्याला या चित्रपटापासून खूप अपेक्षा होत्या. चित्रपटाच्या भूमिकेसाठी त्याने अभिनय आणि पर्सनॅलिटीवर विषेश लक्ष दिले होते आणि यात तो यशस्वीदेखील झाला. लोकांनी "संत्या" हे कॅरेक्टर अक्षरशः डोक्यावर घेतले. याचीच पोचपावती म्हणून त्याला यंदाचा प्रतिष्ठित "मराठी फिल्मफेअर पुरस्कार" मिळाला.

याप्रसंगी अभिनेता ऋतुराज वानखेडे म्हणतो, "सिने इंडस्ट्रीमध्ये आधीच सुरु असलेल्या शर्यतीत आपल्याला यायचं आहे आणि त्यासाठी उत्तम कामाची जोड असणं गरजेचं आहे याची जाण मला होती. जयंती ही माझ्या आयुष्यातील पहिली फिल्म! अर्थात मला या चित्रपटातून भरपूर अपेक्षा होत्या. संत्याचं कॅरेक्टर मी मनापासून साकारलं आणि याचाच निकाल म्हणून आज माझ्या हातात ही "ब्लॅक लेडी" आहे. हे पात्र साकारण्यासाठी मीच "पात्र" असेल असा विश्वास ज्यांनी ठेवला ते दिग्दर्शक "शैलेश नरवाडे" यांचा मी कायम ऋणी राहीन. या पुरस्काराने मला आणखी नव्याने काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे."

या निमित्ताने सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक शैलेश नरवाडे (Writer Director Shailesh Narwade) सांगतात, "हा पुरस्कार केवळ पुरस्कार नसून आमच्या प्रत्येकाची ही स्वप्नपूर्ती आहे. एक ज्वलंत विषय सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा निर्मळ प्रयत्न आम्ही केला आणि त्यात आम्ही यशस्वी झालो याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. जेव्हा आपण एखादा प्रामाणिक प्रयत्न प्रेक्षकांसमोर ठेवतो तेव्हा त्यास प्रशंसेची पोचपावती ही मिळतेच हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे आणि त्यामुळे आमच्या टीमचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे"

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com