Asha Bhosle Birthday: हे जर भारतात जन्मले नसते तर....; राज ठाकरेंच्या आशा भोसलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Asha Bhosle Birthday: हे जर भारतात जन्मले नसते तर....; राज ठाकरेंच्या आशा भोसलेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आशाताई नव्वदीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने राज ठाकरे यांनी लिहिलेला खास लेख वाचाच.
Published by :
Team Lokshahi
Published on

Singer Asha Bhosle Birthday: आपल्या हटके स्टाईलने गाणं म्हणणाऱ्या आणि प्रेक्षकांच्या हृदयावर आजही राज्य करणाऱ्या गायिका म्हणजे आशा भोसले. लता मंगेशकर यांचं गाणं आपल्याला जितकं भावतं, आपलंसं करतं तितकंच आशा भोसलेंचं गाणंही. लतादीदी यांना जर सरस्वतीचं रुप मानलं तर आशाताई या स्वरांची गंगा आहेत असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. आज याच आशा भोसले यांचा ९० वा वाढदिवस आहे. वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणं म्हणण्यास सुरुवात केलेल्या आशाताईंचं आयुष्य हे संघर्षमयी आणि वादळी राहिलं आहे. पण नावाप्रमाणेच त्यांनी कुठल्याही प्रसंगात आशा सोडली नाही. कुठल्याही प्रसंगात त्या डगमगून गेल्या नाहीत. त्यामुळेच त्या आशा भोसले आहेत आणि त्यांचा चिरतरूण आवाज आपल्याला आपलसं करतो, आपल्या काळजाचा ठाव घेतो.

आशाताई बोसले यांच्या वाढदिवसानिम्मित राज ठाकरे यांनी लिहिलेला खास लेख...

आज आशाताईंचा नव्वदावा वाढदिवस. मागचं शतक अद्वितीय होतं, काय माणसं जन्माला आली त्या शतकांत. प्रतिभा ओसंडून वाहत होती असं वाटावं इतकी ती चहुबाजुंनी समोर येत होती. त्या प्रतिभेचे दोन सर्वोच्च आविष्कार म्हणजे लता दीदी आणि आशा ताई. त्यात दीदींचा आवाज तुम्ही कुठेही ऐकलात तरी क्षणात आत, खोल नेणारा, कुठेतरी मुळापासून गदागदा हलवणारा, घुसळून टाकणारा, खोल आत नेऊन त्याच्याशी सख्य करायला लावणारा.

पण आशाताईंचा आवाज मात्र तुम्हाला जमिनीवर आणतो, पुन्हा मर्त्य जगात आणतो. माणूस म्हणला की प्रेम, वासना, झुगारून देणं, तडफडण हे सगळं आलंच, ह्या प्रत्येक भावनेचा आविष्कार आशाताईंच्या आवाजातून प्रकट होताना दिसत राहिला.

म्हणून मी नेहमी म्हणतो की लतादीदी, आशाताई, भीमसेन अण्णा, किशोरीताई आमोणकर, कुमार गंधर्व ह्यांच्यासारखे दैवीस्पर्श लाभलेले, तसंच अनेक गुणी संगीतकार, लेखक, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, चित्रकार, शिल्पकार, हे जर भारतात जन्मले नसते तर भारताला वेड लागायची वेळ आली असती.

अतिशयोक्ती वाटेल, पण ही माणसं होती, त्यांची कला होती म्हणून आसपास इतक्या वाईट गोष्टी घडताना पण जगण्याचं बळ मिळालं. अन्यथा ह्या देशात अराजकच माजलं असतं.

वर म्हणलं तसं तो प्रतिभा ओसंडून वाहण्याचा काळ होता, आता ते सगळं कुठेतरी रितं झाल्यासारखं वाटतंय. पण काळ असाच असतो. हे रितेपण किती, तर आज देखील संगीताचे जे काही शोज टीव्हीवर दिसतात, त्यात जी गाणी गायली जातात ती देखील त्याच काळातील, ह्याच गायक आणि संगीतकारांची असतात. ह्यावरूनच ह्या गायक आणि संगीतकारांपुढे किती मोठं आव्हान आहे हे जाणवतं.

अर्थात ह्या रितेपणाचं दुःख मला नाही कारण मी ह्या दोघींना ऐकलं आहे, अनुभवलं आहे आणि प्रत्यक्ष असंख्य वेळा पाहिलं आहे. जर पुन्हा भारतात कधी प्रतिभेचा बहर येणार असेल, तर ज्या माणसांच्या रूपाने तो बहर येईल, त्यांचा पिंड आशाताईं सारख्यांच्यामुळेच घडेल ह्याबद्दल शंकाच नाही.

आशाताई नव्वद इत्यादी आकडे हे सामान्यांसाठी असतात, तुम्हाला 'शंभरीपार'ला पर्याय नाही. आशाताईंना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा शुभेच्छा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com