माझ्याबाबत दिशाभूल करणारी वक्तव्ये, मी शांत याचा अर्थ कमजोर असा नाही : राज कुंद्रा
माझ्याबाबत अनेक दिशाभूल करणारी बेजबाबदार वक्तव्ये समाजमाध्यमांवर फिरत आहेत. मी शांत आहे याचा अर्थ दुबळा किंवा कमजोर आहे असा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याने केले आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही पोर्नोग्राफीची निर्मिती किंवा वितरणात सहभागी झालो नसल्याचेही देखील कुंद्राने सांगितले आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून याबाबत मी जास्त बोलू इच्छित नसल्याचे कुंद्राने सांगितले आहे. परंतू, मी या संबधीच्या खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, सत्याचा विजय होईल असे कुंद्राने सांगितले आहे.
मला सतत खूप वेदना होत असल्याचेही राज कुंद्राने सांगितले आहे. माझ्या मानवी आणि संवैधानिक अधिकारांचे विविध स्तरांवर उल्लंघन केले जात आहे. मला ट्रोलिंग करणाऱ्या लोकांची भावना खूपच संकुचीत झाली आहे. मीडियामध्ये ज्या पद्धतीने माझ्या विरोधात बातम्या दिल्या जात आहेत, किंवा मला ट्रोलिंग केले जात आहे, त्यामुळे माझ्या वैयक्तीक आयुष्याला किंवा गोपनीयतेला धक्का लागू नये, अशी माझी इच्छा असल्याचे कुंद्राने सांगितले आहे. नेहमीच माझे कुटुंब ही माझी प्राथमिकता राहिली आहे .
पोर्नोग्राफी व्हिडीओ प्रकरणी राज कुंद्रावर विविध आरोप लावण्यात आले आहेत. याप्रकरणी त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर त्याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज कुंद्राला चार आठवड्यांसाठी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये पॉर्नोग्राफी व्हिडिओ प्रकरणात अडकलेल्या राज कुंद्राचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. हायकोर्टाने याचिका फेटाळून लावत न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी राज कुंद्राला सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती.
त्यानंतर कुंद्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई हायकोर्टने राजसोबतच सहा लोकांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यामध्ये अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि अभिनेत्री पूनम पांडे यांच्याही नावांचा समावेश आहे. या प्रकरणात उमेश कामत, सुवोजित चौधरी आणि सॅम अहमद हे तिघेही आरोपी आहेत. पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला जुलै 2021 मध्ये अटक झाली होती. जवळपास दोन महिने राज अटकेत होता. त्यानंतर त्याला सप्टेंबर 2021 मध्ये जामीन मिळाला. राज कुंद्राविरोधात कलम 292, 293 आणि आयटी कायद्याच्या कलम 66E, 67, 67A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.