अभिनेता प्रतीक बब्बर वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर चर्चेत असते. मग ते अभिनेत्याचे प्रेम असो किंवा वडिलांसोबतचे त्याचे नाते असो. याशिवाय आणखी एका गोष्टीबद्दल प्रतिक अनेकदा बोलतो त्या म्हणजे त्याची आई आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आहेत. प्रतीकने स्मिता पाटील यांच्यासोबतच्या नात्याला नव्या उंचीवर नेले आहे. वास्तविक प्रतीक बब्बरने आपले नाव बदलण्याची घोषणा केली आहे. स्मिता पाटीलच्या स्मरणार्थ त्याने आपले नाव आता प्रतीक पाटील बब्बर असे ठेवले आहे.
प्रतीक पाटील बब्बर म्हणाला की, माझे वडील आणि माझे संपूर्ण कुटुंब, माझे दिवंगत आजी-आजोबा आणि माझी दिवंगत आई यांच्या आशीर्वादाने मी माझ्या आईचे आडनाव माझे मधले नाव म्हणून जोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्क्रीनवरही माझे नाव प्रतीक पाटील बब्बर म्हणूनच दाखवले जाईल. हा मुद्दा थोडा अंधश्रद्धेचा आणि थोडा भावनिकतेचा आहे, असेही त्याने म्हंटले आहे. तसेच, जेव्हा माझे नाव एखाद्या चित्रपटामध्ये किंवा इतरत्र दिसेल तेव्हा माझ्या आईच्या विलक्षण आणि गौरवशाली वारशाची आठवण होईल, असे मला वाटते.
तो पुढे म्हणाला, आई माझ्या प्रत्येक प्रयत्नाचा भाग असेल. पण माझ्या नावाचा भाग म्हणून तिचे आडनाव ठेवल्याने भावना दृढ होते. या वर्षी ती आपल्याला सोडून 37 वर्षे पूर्ण होईल, पण ती आता कधीही विसरली जाणार नाहीत याची मी काळजी घेईन. स्मिता पाटील माझ्या नावाने जगतील, असेही प्रतीकने म्हंटले आहे.
दरम्यान, स्मिता पाटील ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. छोट्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आणि चित्रपटसृष्टीवर मोठी छाप सोडली. या अभिनेत्रीने 'मिर्च मसाला', 'मंडी' आणि 'अर्थ' यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. स्मिता पाटील यांचे वयाच्या 31 व्या वर्षी 1986 मध्ये निधन झाले. प्रतीक हा स्मिता पाटील आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा असून 15 वर्षांहून अधिक काळ अभिनय करत आहे.