'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'चा ट्रेलर वादाच्या भोवऱ्यात! दिग्दर्शकाला पोलिसांची नोटीस
सत्य घटनांवर आधारित असलेल्या 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच वादात सापडला आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पश्चिम बंगालने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी दिग्दर्शकाला चौकशीस हजर राहण्यास सांगितले आहे. हा चित्रपट पश्चिम बंगालच्या रोहिंग्या मुस्लिमांच्या कट्टरतावादी संघटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.
'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल'च्या माध्यमातून पश्चिम बंगालची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला आहे. जितेंद्र नारायण सिंह वसीम रिझवी फिल्म्स प्रस्तुत 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' चे निर्माते आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा आहेत. चित्रपटाविरोधात त्यांना पश्चिम बंगाल पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. यानंतर आता दिग्दर्शक सनोज मिश्रा यांना 30 मे रोजी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहावे लागणार आहे. सिनेमॅटोग्राफी कायद्याच्या कलम 7 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
ट्रेलर लॉन्चवेळी निर्माता जितेंद्र नारायण सिंह म्हणाले होते की, गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम बंगालमधील परिस्थिती अत्यंत धोकादायक बनत चालली आहे. तेथे बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना असलेल्या रोहिंग्या मुस्लिमांची मोठ्या प्रमाणावर वस्ती केली जात आहे. पश्चिम बंगाल सरकार रोहिंग्यांना आपली व्होट बँक बनवून त्यांचे आधार कार्ड आणि मतदार यादीत नावे मिळवून देत आहेत. हे रोहिंग्या मुस्लिम पश्चिम बंगालमधून आयडी बनवून देशभर पसरत आहेत आणि पश्चिम बंगालच्या ममता सरकारच्या माध्यमातून या विदेशी दहशतवादी संघटना एका खास हेतूने भारतभर पसरवल्या जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला होता.