'पठाण'चा वाद थांबेना! बजरंग दलाने केली थिएटरची तोडफोड
अहमदाबाद : शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपटाचा वाद काही थांबायचे नाव घेत नाहीये. पठाण २५ जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. परंतु,या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने विरोध केला आहे. अहमदाबादमधील एका मॉलमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर फाडले असून तोडफोड केली आहे. व चित्रपट प्रदर्शित न करण्याची थिएटर मालकाला धमकी दिली.
अहमदाबादच्या वस्त्रापूर भागातील अल्फा वन मॉलमध्ये पठाणचे प्रमोशनल पोस्टर लावण्यात आले होते. मात्र, ही बातमी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचताच ते मॉलमध्ये पोहोचले. आणि मॉलमध्ये कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीसह गोंधळ घातला. यावेळी चित्रपटाचे पोस्टरही फाडण्यास सुरुवात केली. हा गोंधळ पाहून मॉलमध्ये उपस्थित लोक घाबरले होते. या घटनेची माहिती समजताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि कार्यकर्त्यांना समज देऊन शांत केले. परंतु, त्यांनी चित्रपटाबाबत दिलेला इशारा पाहता पोलीस सतर्क झाले आहेत. या मॉलची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
12 डिसेंबर रोजी 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्याच्या रिलीजवरून वाद सुरू झाला होता. या गाण्यातील दीपिका पदुकोणची 'भगवी बिकीनी' चर्चेत आहे. चित्रपटातील भगव्या रंगाच्या अपमानाविरोधात हिंदू संघटना तसेच नेते, मंत्रींनी आवाज उठवला आहे. चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, नुकतेच सेन्सॉर बोर्डाने 'पठाण' चित्रपटात काही बदल करण्याचे आदेश दिले आहेत.