“वन्स मोअर तात्या” लवकरच रंगभूमीवर
मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अजब नात आहे. त्यात मालवणचा ठसका असलेले नाटक आले तर मेजवाणीच. अशीच एक मेजवाणी पुन्हा एकदा वाट्याला येत आहे. कारण "वन्स मोअर तात्या" हे मालवणी नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. कोकणातल्या सर्व गजाली हया नाटकात ऐकायला आणि बघायला मिळणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांसाठी हे नाटक म्हणजे पर्वनीच असणार आहे.
गेली अनेक वर्षे रंगभूमीवर कार्यरत असणारे 'आमची ब-टाटाची चाळ', 'आनंदयात्री', 'गोलपीठा', 'लव यू बाबा' हया सारखी दर्जेदार नाटकं देणारे लेखक दिग्दर्शक मिलिंद पेडणेकर हया मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोली भाषेतून "वन्स मोअर तात्या" हे नवंकोरं नाटक रसिकांसाठी रंगभूमीवर आणले आहे. एका गावातील दोन वाडीत झालेला वाद मिटविण्यासाठी तात्या गावात येतो आणि तो वाद दोन वाडींना एकत्र घेऊन नाटक बसविण्याच्या माध्यमातून तो मालवणी धूमशान घालतो, असं नाटक म्हणजे 'वन्स मोअर तात्या'. दोन वाडीचा वाद, तो वाद मिटविताना घडणार्या गमतीजमती, आणि त्याचा सुंदर शेवट या नाटकात पाहायला मिळणार आहे. तसेच कोकणातल्या सर्व गजाली हया नाटकात ऐकायला आणि बघायला मिळणार आहेत.
मिलिंद पेडणेकर यांनी या नाटकाचे लेखन – दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. लेखन, दिग्दर्शन, निर्माता आणि अभिनेता या चारही भूमिका या नाटकात त्यांनी सांभाळल्या आहेत. हया नाटकात पूर्ण मालवणी टीम आहे. नाटकात काम करणारे सर्व कलाकार एकापेक्षा एक सरस असून ते अस्सल मालवणी बोलणारे आहेत. निर्माता राहुल भंडारे, विशाल परब आणि मिलिंद पेडणेकर यांनी हे नाटक रंगभूमीवर आणले असून मालवणी रसिकांना मालवणी मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.
नाटकाचा प्रयोग
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता सावित्रीबाई फुले, डोंबिवली, रविवार दि. १९ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता कालिदास, मुलुंड, शुक्रवार दि. २४ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले, शनिवार दि. २५ डिसेंबर दुपारी १२ वाजता विष्णुदास भावे, वाशी, रविवार दि. २६ डिसेंबर, दुपारी ४.३० वाजता दामोदर हॉल, परळ येथे होणार आहेत.