करण जोहर तयार करणार जालियनवाला बाग हत्याकांडावरील सिनेमा
करण जोहरने आपल्या पुढच्या सिनेमाची घोषणा केली आहे. हा सिनेमा स्वातंत्र्यचळवळीच्या काळात घडलेल्या कुख्यात जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित असणार आहे. करण जोहर या सिनेमाची निर्मिती करणार आहे, तर करण सिंग त्यागी डायरेक्शन करणार आहे. सध्यातरी करण जोहरने या सिनेमाबद्दल एवढीच माहिती दिली आहे. अजून सिनेमाची कथा पूर्ण लिहूनदेखील झालेली नाही. या हत्याकांडानंतर झालेल्या खटल्याचा तपशील यामध्ये असणार आहे.
शंकरन नायर यांनी याप्रकरणी ब्रिटिश साम्राज्याविरोधात खटला चालवला होता. या प्रकरणामागील सत्य उजेडात आणून त्यांनी देशभर स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा वणवा भडकावला होता. अनेक सत्य घटनांचे संदर्भ त्यासाठी देण्यात आले आहेत. शंकरन नायर यांचे पणतू रघू पलत आणि त्यांच्या पत्नी पुष्पा पलत यांनी लिहिलेल्या 'द केस दॅट शूक द एम्पायर' या पुस्तकाच्या आधारे या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे, असे प्रॉडक्शन हाऊसने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.