जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
अभिनेत्री आशा पारेख यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. ३० सप्टेंबर रोजी आशा पारेख यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल भारतातील सर्वोच्च चित्रपट सन्मान दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केली आहे. याच्याआधी त्यांचा १९९२ मध्ये अभिनयामधील योगदानासाठी भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवही केला होता.
जुन्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये आशा पारेख यांचे नाव ओळखले जाते, तर त्यांनी 95 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कारांचे आयोजन केले जाते. 2 ऑक्टोबर 1942 रोजी जन्मलेल्या आशा पारेख यांनी बेबी आशा पारेख या नावाने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली.
‘मेरा गाव मेरा देश’, ‘कटी पतंग’, ‘तीसरी मजिल’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री म्हणून आशा पारेख यांना ओळखले जाते. त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात चांगलीच निर्माण केली आहे. ६० ते ७० च्या दशकात बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. त्या ७९ वर्षांच्या आहेत.