कंगना रणौतला हायकोर्टाचा दिलासा
लोकशाही न्यूज नेटवर्क
कंगना रणौतच्या खार पश्चिम येथील इमारतीच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महानगरपालिकेने ५ फेब्रुवारीपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. ५ फेब्रुवारीपर्यंत या अनधिकृत बांधकाम प्रकरणी कंगनाला मुंबई महानगरपालिकेसोबत संवाद साधून बेकायदेशीर बांधकाम कायदेशीर करण्याबद्दलचे अर्ज करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अभिनेत्री कंगना राणावत तिच्या खार येथे असलेल्या ऑर्किड ब्रिज या इमारतीतल्या तीन फ्लॅट मध्ये बदल करून हे तिन्ही फ्लॅट अनधिकृत बांधकामाद्वारे एकत्र करण्यात आल्याचा आरोप मुंबई महानगरपालिकेने केला. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेकडून अभिनेत्री कंगना रणौत हिला २०१८ मध्ये नोटीसही बजावण्यात आली होती. या प्रकरणी कंगनाने दिंडोशी न्यायालयात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर तिने हायकोर्टात अपील केलं.
या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी कंगनाच्यावतीने अॅड बिरेंद्र सराफ यांनी कोर्टाला सांगितले की, "आपल्याला सदर बांधकाम हे रितसर अधिकृत करायचे आहे. त्यावर पालिकेच्यावतीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील अस्पि चिनॉय यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून घेत अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज करावा, असे निर्देश देत ५ फेब्रुवारीपर्यंत पालिकेने कारवाई करू नये असे आदेश दिले आहेत.