रितेश देशमुखला लागले डोहाळे? पोस्टमुळे चाहते संभ्रमात
रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख ही बॉलीवूडची हिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'तेरे नाल लव हो गया' या 2012 च्या शेवटच्या चित्रपटानंतर ते आता एका नवीन कॉमेडी चित्रपटाद्वारे पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या पुढील चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. 'मिस्टर मम्मी' असं सिनेमाचं नाव असून दोघंही एका वेगळ्या भूमिकेत यात दिसत आहेत.
'मिस्टर मम्मी' चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. यामध्ये जेनेलियाच नाही, तर रितेशही गरोदर असल्याचं दिसत आहे. पोस्टरनुसार हा एक कॉमेडी चित्रपट असून, हे दोघे बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. 'मिस्टर मम्मी' चित्रपटाचे दिग्दर्शन शाद अली करत आहेत आणि याचे निर्माते भूषण कुमार आणि कृष्ण कुमार आहेत.
T-Series ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर 'मिस्टर मम्मी' चे फर्स्ट लूक पोस्टर शेअर केले आहे. यावेळी त्यांनी लिहिलं की, 'आम्हाला कळलंय की तुमच्याकडे एक गोड बातमी आहे?' यावर अभिनेत्री म्हणते की, 'मी यांना विचारून सांगते. पण आता सांगू का?' तेव्हा रितेशही उत्तर देत म्हणतो की, 'अरे माझ्या मुलांची आई, थांब जरा, आपण उद्या सांगू.' यानंतर चाहत्यांना काही कळलं नाही, पण त्यांनी गोड बातमीसाठी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली.