सारा अली खानच्या आगामी 'ए वतन मेरे वतन'चा फर्स्ट-लुक रिलीज
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिचा चाहतावर्ग मोठा आहे. तसेच, आपल्या विविध व्यक्तिरेखांनी साराने दर्शकांची मने नेहमीच जिंकली आहेत. अशातच, सारा अली खानचा आगामी चित्रपट 'ए वतन मेरे वतन'चा फर्स्ट लूक सोमवारी रिलीज करण्यात आला. एका छोट्या टीझरमार्फत 'ए वतन मेरे वतन' या सिनेमाची घोषणा करण्यात आली.
या थ्रिलर ड्रामा चित्रपटाच्या टीझरमध्ये सारा हळूच एका अंधाऱ्या खोलीत येते, आणि रेडिओ सदृश यंत्र सुरू करून बोलायला सुरू करते. स्वातंत्र्यपूर्व काळातील ‘भारत छोडो’आंदोलनाचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात, आणि अशातच तिच्या घराचे दार ठोठावल्याचा आवाज येतो. 'ए वतन मेरे वतन' हा सिनेमा सत्य घटनांनी प्रेरित असून, ही कथा मुंबईतील महाविद्यालयात शिकणाऱ्या एका धाडसी तरुणीची आहे जी स्वातंत्र्यसैनिक बनते. तसेच, यामध्ये आपल्याला १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाची पार्श्वभूमी पाहायला मिळणार आहे.
धर्मा एंटरटेनमेंट प्रोडक्शनच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली असून सोमेन मिश्रा यांनी सह-निर्मिती केली आहे. सत्य घटनांपासून प्रेरित असलेल्या या थ्रिलर ड्रामाचे दिग्दर्शन कन्नन अय्यर यांनी केले असून दरब फारुकी आणि कन्नन अय्यरद्वारा लिखित या चित्रपटात सारा अली खान एका धाडसी स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'ए वतन मेरे वतन' जगभरातील 240 हून अधिक देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम सदस्यांसाठी उपलब्ध होईल.