दिशा सालियन प्रकरणी मोठी बातमी! सीबीआयने सांगितले मृत्यूचे कारण
मुंबई : सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. दिशा सालियनचा मृत्यू अपघातीच असल्याचे सीबीआयने आपल्या अहवालातून स्पष्ट केले आहे. दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणावरुन राज्यात मोठे राजकीय नाट्य रंगले होते. त्यानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. परंतु, दिशाचा मृत्यू हा अपघातीच असल्याचे समोर आले आहे.
सुशांत सिंह राजपूरचा मृत्यूच्या पाच दिवस आधी दिशा सालियनचा मृत्यू झाला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे सुशात सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी जोडलं जात होतं. यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपही झाले. मात्र, दिशा सालियन मृत्यूप्रकरणाचा सुशांत सिंहच्या मृत्यूप्रकरणाशी कोणताही संबंध नाही. दिशाचा मृत्यू अपघातीच असल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 8 जूनच्या रात्री दिशाने एक पार्टी आयोजित केली होती. त्यात ती मद्यधुंद अवस्थेत 14 व्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीतून खाली कोसळली असल्याचे सीबीआयने माहिती अहवालात दिली आहे.
दरम्यान, सीबीआयच्या अहवालानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर, शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी देर आये दुरुस्त आये. भगवान के घर देर हैं अंधेर नाही. ज्या लोकांनी तोंडपाटीलकी केली त्यांची तोंड रंगली असतील, अशी टीका केली आहे.