मराठी चित्रपटामध्ये झळकणार दया …
नवीन चेहऱ्यांच्या जोडीला हिंदी-साऊथमध्ये गाजलेले चेहरे नेहमीच मराठी चित्रपटांमध्ये लक्ष वेधणारे ठरले आहेत. आज मराठी चित्रपटांची ख्याती इतकी दूरवर पसरलीय की, हिंदीसोबत दक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांनाही मराठीत काम करण्याचे वेध लागले आहेत. टेलिव्हीजन विश्वातील सर्वात मोठा क्राईम शो ठरलेल्या 'सीआयडी' (CID) या मालिकेतील एसीपी प्रद्युम्नसोबत आणखी एक कॅरेक्टर खूप पॅाप्युलर झालं. या कॅरेक्टरचं नाव आहे दया… जनमानसात दया याच नावानं ओळखला जाणारा अभिनेता दयानंद शेट्टीही (Dayanand Shetty) आता मराठीत पदार्पण करतोय. नुकत्याच मुहूर्त झालेल्या 'गरम किटली' (garam kitali) या मराठी चित्रपटात दया एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
गणेश रॅाक एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली 'गरम किटली' या चित्रपटाची निर्मिती केली जात असून चित्रसेन नाहक आणि राजेश हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नुकताच मुहूर्त झाल्यानंतर लगेचच 'गरम किटली'च्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे. कथा, पटकथा आणि संवादलेखन करणारे राज पैठणकर (Raj Paithankar) या चित्रपटाचं दिग्दर्शनही करत आहेत. 'सीआयडी' मालिकेतील 'दया दरवाजा तोड दो…' हा संवाद अगदी लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच तोंडपाठ झाला आहे. आता मराठी प्रेक्षकांना आपल्या मातृभाषेतील चित्रपटामध्ये दयाचा जलवा पहायला मिळणार आहे. दयानं आजवर बऱ्याच जाहिरातींमध्येही काम केलं आहे. यासोबतच थिएटर आर्टिस्ट म्हणून पुरस्कारही जिंकले आहेत. तुळू भाषेतील 'सिक्रेट' (Secret) या नाटकातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. १९९८ मध्ये 'सीआयडी' मालिकेत मिळालेली सीआयडी आॅफिसरची भूमिका दयाच्या करियरला कलाटणी देणारी ठरली. 'जब दया का हाथ पडता है, तो मुंह के अंदर दातों से पियानो बजने लगता है…' हा या मालिकेतील डायलॅागही खूप गाजला आहे. हाच दया आता 'गरम किटली' घेऊन मराठी रसिकांसमोर येणार आहे.
'गरम किटली'मध्ये दया नेमक्या कोणत्या भूमिकेत दिसणार हे गुपित सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. वेळ आल्यावर त्यावरूनही पडदा उठेल असं सांगण्यात येत आहे. यात दयासोबत आदित्य पैठणकर व श्रद्धा महाजन (Shraddha Mahajan) ही नवी जोडी आणि विजय पाटकर (Vijay Patkar), अंशुमन विचारे (Anshuman Vichare), कमलेश सावंत(Kamlesh Sawant), विशाखा सुभेदार(Visakha Subhedar), मनीषा पैठणकर (Manisha Paithankar), विराज गोडकर (Viraj Godkar), पल्लवी पाटील (Pallavi Patil) आदी कलाकार आहेत. राज पैठणकरनंच यातील गीतरचना लिहील्या असून, किरण-राज या संगीतकार जोडीनं त्या संगीतबद्ध केल्या आहेत. अनिकेत के. सिनेमॅटोग्राफर, तर योगेश महाजन क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. कपिल चंदन या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, देवदत्त राऊत(Devdutt Raut) आणि नंदू मोहरकर (Nandu Moharkar) कला दिग्दर्शक म्हणून काम पहात आहेत.