असा आहे 'बिग बॉस 16' चा रनर अप मराठमोळ्या शिवचा खडतर प्रवास...
मुंबई : 'बिग बॉस 16' (Big Boss 16) चा विजेता घोषित झाला आहे. रॅपर म्हणून प्रसिद्ध असलेला एमसी स्टॅनने (MC Stan) हा शो जिंकला. बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की विजेत्याचे नाव जाणून घेण्यासाठी लोक अत्यंत उत्सुक होते. फायनलच्या दिवशी सुरुवातीला असे वाटले की एमसी स्टॅन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे, मात्र असे काही घडले नाही. मात्र दुसरीकडे जे लोक शो जिंकण्याचा दावा करत होते, यामध्ये प्रामुख्याने मराठमोळा शिव ठाकरेचं (Shiv Thakre) नाव घेतलं जात होत शेवटी शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन शोमध्ये राहिले. पण यावेळी मराठमोळा शिव ठाकरे रनर अप राहिला.
'बिग बॉस 16' च्या ग्रॅंन्ड फिनाले पर्यंत पोहचणारा मराठमोळा शिव ठाकरे कोण आहे ? जाणून घेऊ... 'बिग बॉस 16' मध्ये येण्याआधी शिव ठाकरे बिग बॉस मराठीच्या सीझन 2 चा विजेता ठरला होता. त्यानंतर तो चर्चेत आला. माध्यमांमध्येही तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. शिव डान्सर आणि कोरिओग्राफरही आहे. शिवाचा जन्म 9 सप्टेंबर 1989 रोजी अमरावती येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मनोहर ठाकरे. त्याचे सुरूवातीचे शिक्षण अमरावतीमध्येच झालं. त्यानंतर नागपूरला त्याने इंजिनीअरिंगची पदवी घेतली. या दरम्यान त्याने अत्यंत कष्ट घेतले आहेत. त्याने त्याच्या वडिलांच्या पानाच्या दुकानातही आपल्या बहिणीसोबत काम केले. तसेच आपण बहिणीसोबत वर्तमानपत्र विकले, दुधाची पाकिटेही विकल्याचे त्याने एका शो दरम्यान सांगितले होते.
पण त्याला इंजिनीअर नाही तर अभिनेता व्हायचे होते. त्यामुळे त्याने करिअरच्या सुरुवातीला डान्स कोरिओग्राफी, इव्हेंट मॅनेजमेंट केले. शिव ठाकरेने एमटीव्ही रोडीज रायझिंग या टीव्ही रिअॅलिटी शोमधून करिअरची सुरुवात केली. या शोमध्ये पोहोचायला त्याला पाच वर्षे लागली. शिवने उपांत्य फेरी गाठली होती. पण तो शो जिंकू शकला नाही. शिव हा व्यवसायाने डान्सर आहे. त्याने स्वतःचा डान्स स्टुडिओ उघडला आहे. त्याने अनेक शोमध्ये भाग घेतला आहे. शिव एक फिटनेस फ्रीक आहे. त्याला वर्कआउट करायला आवडते. तो अनेकदा त्याचे फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.
शिव ठाकरेची एकूण संपत्ती जवळपास 10 कोटी रुपयांच्या आसपास आहे. सोशल मीडियावर त्याचे तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तो नेहमी त्याच्या डान्सचे आणि वर्कआउट सेशनचे व्हिडीओ शेअर करत असतो. शिवच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं झालं तर 'बिग बॉस मराठी' मध्ये त्याची वीणा जगतापशी ओळख झाली. वीणा आणि शिव आधी चांगले मित्र झाले आणि नंतर त्याचं रूपांतर प्रेमात झालं. सोशल मिडीयावर ते दोघ नेहमी चर्चेत असतात.