Charcha Tar Honarach : आदिती आणि आस्तादची 'चर्चा तर होणारच' रंगभूमीवर सात वर्षांनी पुन्हा एकत्र दिसणार
काहीजण हे चर्चेचा विषय असतात तर चर्चेत राहण्यासाठी हल्ली कोण काय करतील? याचाही नेम नसतो. सध्या मात्र नाटयवर्तुळात एक वेगळीच जोरदार ‘चर्चा’ रंगली आहे. आदिती सारंगधर, क्षितिज झरापकर आणि आस्ताद काळे एकत्र आल्याने ही ‘चर्चा तर होणारच’होती.
या तिघांनी नेमकं काय केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर 19 नोव्हेंबरला या प्रश्नाचं उत्तरं या तिघांकडूनच मिळणार आहे. या त्रिकुटाच्या चर्चा तर होणारच! या नव्या नाटकाचा शुभारंभ 19 नोव्हेंबर शनिवार सायं 5 वाजता बालगंधर्व, पुणे येथे होणार आहे. तर 20 नोव्हेंबर रविवार रात्रौ 8.30 वा. ठाणे येथील गडकरी रंगायतनला दुसरा प्रयोग सादर होईल.
रंगनील व वेद प्रॉडक्शन्स निर्मित आणि आर्या व्हिजन प्रस्तुत हे नवं नाटकं रंगभूमीवर येतयं. लेखक-दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांची ही नाटयकृती आहे. कल्पना कोठारी आणि विनय अलगेरी या नाटकाचे निर्माते आहेत.
चर्चेत राहण्यासाठी आम्हाला सिर्फ नाम ही काफी हैं... ‘चर्चा तर होणारच’! अशी जाहिरात करत रंगभूमीवर खमंग ‘चर्चा’ घडवायला येत असलेल्या या नाटकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चर्चा तर होणारच! हे नर्मविनोदी अंगाने सामजिक भाष्य करणार ख़ुशखुशीत नाटकं आहे. प्रपोझल या नाटकानंतर आदिती सारंगधर आणि आस्ताद काळे ही जोडी सातवर्षाने या नाटकाद्वारे रंगभूमीवर एकत्र येत आहे.
एका स्पर्धेच्या निमित्ताने घडणारं चर्चासत्र त्यात बाजी मारण्यासाठी झालेल्या युक्त्या, कुरघोड्या आणि त्यातून रंगणारं धमाल,क्लासिक,मिश्किल नाटक म्हणजे चर्चा तर होणारच! चर्चा तर होणारच! नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे तर प्रकाशयोजना अमोघ फडके यांची आहे. संगीत राहुल रानडे यांचे आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे.