अशोक सराफ व रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर!
मराठी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या नाट्यकर्मींचा दरवर्षी नाट्य परिषदेच्या वतीने सन्मान केला जातो. यंदा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबईच्या वतीने 14 जून रोजी गो.ब. देवल पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.यंदाच्या वर्षासाठी जेष्ठ सिने-नाट्य अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मागील तीन वर्षांपासून पुरस्कारांचे वितरण करण्यात आले नव्हते. नाट्य परिषदेची निवडणूक पार पडताच, कमी वेळात तातडीने नवनिर्वाचित नियामक मंडळाने जीवनगौरव पुरस्कार देण्याचे योजिले आहे.
दरवर्षी नाट्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या रंगकर्मीचा मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सत्कार केला जातो. याही वर्षी हा सन्मान सोहळा केला जाणार आहे. नुकतेच 100वे नाट्य संमेलन पार पडले. या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला ‘नाट्य कलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिकप्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्य संगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम सादर होणार आहेत. यंदाच्या वर्षी 14 जून 2024 रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. तर हा पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, मनमाला टॅक रोड, मांटुगा -माहीम, मुंबई येथे सायंकाळी 4 वाजता होईल. या संबंधीत माहिती ही नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली आहे.
तसेच १०० व्या नाट्यसंमेलनानिमित्त घेण्यात आलेला ‘नाट्यकलेचा जागर’ यातील सर्वोत्कृष्ट पारितोषिक प्राप्त एकांकिका, बालनाट्य, एकपात्री, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन कार्यक्रम यानिमित्ताने सादर होणार आहेत. कलावंत व नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन प्रशांत दामले यांनी केले आहे.