आशा भोसले महाराष्ट्र भूषण पुरस्कारने सन्मानित; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उपस्थित
मुंबई : आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात चतुरस्र हा शब्दही थीटा पडावा अशी चौफेर कामगिरी बजावत गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले यांना आज राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण 2021चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित आहेत.
विविध छटा असलेली अनेक प्रकारची गाणी अजरामर करणाऱ्या आशा भोसले यांचा जन्म 1933 साली झाला. संगीत आणि नाटकाचा वारसा असलेल्या आशा भोसले यांनी लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. आशा भोसले यांची कारकीर्द सुरू झाली 1943 साली. त्यानंतर 1948 मध्ये त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांनी बॉलीवूडमध्ये सात दशकं अधिराज्य गाजवलंय.
बॉलीवूडध्ये तब्बल 1000 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी प्ले-बॅक सिंगर म्हणून आवाज दिला आहे. बॉलीवूडमध्ये आशाताईंना 'मेलडी क्वीन' म्हणून ओळखलं जातं. आशाताईंनी आत्तापर्यंत 11,000 पेक्षा जास्त गाणी गायली आहेत. आशा भोसले, 1943 पासून या क्षेत्रात आहेत. ज्यात त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली आहेत.
विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायल्यामुळे 2011 साली आशा भोसले यांचं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं. आशा भोसले यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, तामिळ, इंग्रजी अशा भाषेत गाणी गायली आहेत. भोसले यांना 18 वेळा फिल्मफेअरसाठी नामांकन मिळालं होतं.