अनुष्का शर्मा सकाळी उठल्या उठल्या करते तेलाच्या गुळण्या!
उत्तम आरोग्यासाठी चांगल्या सवयीचा आपल्या आयुष्यात समावेश असणं गरजेचं असतं. सकाळी उठल्यानंतर सामान्यपणे आपण सर्वजण ब्रश करतो. पण काहींची दिनचर्या थोडी वेगळी असते. अशाच वेगळ्या पद्धतीने अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दिवसाची सुरुवात करते. अनुष्का सकाळी उठल्यानंतर ब्रश करत नाही तर त्याआधी एक महत्त्वाचं काम करते. तिने आपल्या सोशल मीडियावर याची थोडीशी माहितीही दिली आहे.
अनुष्काच्या दिवसाची सुरुवात होते ती ऑईल पुलिंगने (Oil Pulling). अनुष्काने आपल्या इन्टाग्रामच्या पोस्ट शेअर केले आहे. अनुष्काने आयुर्वेदिक औषधी आणि तेलाच्या गुळण्या करण्याचे महत्व या पोस्टद्वारे सांगितले आहे. या फोटोमध्ये तिचा लाडका कुत्राही दिसत आहे. अनुष्काने फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, "माझ्या स्वीट-स्मूश-डॉग्गो ड्यूडच्या सहवासात Oil Pulling करण्याचं माझं सकाळचं रुटीन असतं! ही एक प्राचीन आयुर्वेदिक गोष्ट आहे. ती 'कवल' (Kavala) किंवा 'गंडूश' (Gundusha) म्हणून ओळखली जाते. हे दात निरोगी ठेवण्याचं एक तंत्र आहे. त्यामध्ये सकाळी रिकाम्या पोटी काही मिनिटं थोडंसं तेल तोंडात धरून त्याच्या गुळण्या केल्या जातात आणि नंतर ते तेल थुंकून टाकलं जातं"
"ही प्रक्रिया दातांची स्वच्छता आणि आरोग्यासाठी उत्तम आहे. यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात. सध्या आपण सर्व जण या वेळेचा उपयोग आपल्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी आणि आपली रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी करत आहोत. त्यामुळे मी हे शेअर करण्याचा विचार केला आहे. तुम्हा सर्वांनाही ते फायदेशीर ठरेल, अशी आशा आहे"
मौखिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि शरीरातले विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी रिकाम्या पोटी केली जाणारी ही एक प्राचीन क्रिया आहे. सकाळी उठल्या उठल्या दात घासण्यापूर्वी काही मिनिटं थोडंसं खाद्यतेल तोंडात धरून फेस येईपर्यंत 10 ते 15 मिनिटं तोंडात गुळण्या करावा आणि नंतर थुंकून टाकवे. अशा प्रकारे ही क्रिया केली जाते.