तब्बल 18 वर्षांनंतर अनुराधा पौडवाल यांचं मराठीत पुनरागमन; 'कुलस्वामिनी'मधील गाण्याला दिला स्वरसाज!
प्रत्येक भक्ताचं आपल्या ईश्वराशी नातं वेगळं असतं. कुणी पूजा-अर्चेतून देवाची आळवणी करतात तर कुणी व्रत-वैकल्य करून. तर काही भक्त मनोभावे आपल्या आर्त स्वरांनी भगवंताला साकडं घालतं. खरे पाहता अवघ्या विश्वाची माता म्हणून जिला तिन्ही लोक पूजतात, अशा देवीमातेचं भक्तांशी असलेलं असंच अनोखं नातं अत्यंत श्रवणीय स्वरूपात सगळ्यांसमोर मांडणारं 'कुलस्वामिनी' या आगामी चित्रपटाचं पहिलं गाणं आज लाँच झालं आहे. खरंतर हे गाणं नसून देवीमातेची अत्यंत भक्तीभावाने केलेली आरतीच आहे. आणि या भक्तीरसात चैतन्य आणि थेट भगवंताशी शब्दांच्या पलीकडचं नातं निर्माण करायला लावणारा सुमधूर आवाज आहे पद्मश्री पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांचा!
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या गायिका अनुराधा पौडवाल यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत असंख्य गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे. पण 'कुलस्वामिनी' चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 18 वर्षांच्या कालखंडानंतर अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात एखादं मराठी गाणं किंवा आरती आपल्याला ऐकायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी अनुराधा पौडवाल यांनी 'जय देवी, जय देवी, जय महालक्ष्मी' ही आरती गाण्याच्या स्वरूपात गायली आहे. त्यांच्या चाहत्यांसाठी अर्थात देवीमातेच्या तमाम भक्तांसाठी गाण्याच्या स्वरूपातली ही आरती म्हणजे अनोखी पर्वणी न ठरती तरच नवल! ही आरती ऐकल्यानंतर आपल्याला याची यथार्थ खात्रीच पटते!
अनुराधा पौडवाल यांनी 1973 साली प्रदर्शित झालेल्या अभिमान या हिंदी चित्रपटातून आपल्या गायनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांच्या सुमधुर आवाजाला पहिल्याच चित्रपटात सोनेरी झळाळी लाभली ती संगीतकार एस. डी. बर्मन यांच्या संगीताची! त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आत्तापर्यंत अनुराधा पौडवाल यांनी मराठी आणि हिंदीसोबत तमिळ, ओडिया, नेपाळी, बंगाली आणि कानडी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
'कुलस्वामिनी' या चित्रपटातील हे गाणं आज लाँच करण्यात आलं आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात 11 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. अल्ट्रा मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते कंपनीचे सीईओ सुशीलकुमार अग्रवाल आहेत. या गाण्याचे संगीतकार अभिजीत जोशी असून लघुपट, चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील चित्रपटांचा अनुभव गाठीशी असलेले जोगेश्वर ढोबळे यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.