आदिपुरुषच्या डायलॉगवरुन वाद; निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय
प्रभास स्टारर आदिपुरुष चित्रपट जगभरात रिलीज झाला आहे. परंतु, रिलीज होताच त्यातील संवादावरुन वाद सुरु झाले आहे. काही डायलॉगवर अनेकांनी आक्षेप नोंदविला आहे. यावरुन आदिपुरुषला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल करत निर्माते आणि लेखकावर टीका केलीे. सततच्या विरोधानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठी घोषणा केली आहे.
चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी आदिपुरुषचे संवाद बदलणार असल्याची घोषणा केली आहे. मनोज मुंतशीर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले, मी आणि चित्रपटाच्या निर्माते-दिग्दर्शकाने ठरवले की, जे काही संवाद तुम्हाला दुखावत आहेत. आम्ही त्यात बदल करू आणि ते या आठवड्यात चित्रपटात समाविष्ट केले जातील, अशी माहिती त्यांनी सांगितली आहे.
यासोबतच या चित्रपटासाठी 4000 हून अधिक ओळींचे संवाद लिहिले आहेत. त्यापैकी ज्या ५ संवादावर आक्षेप नोंदविले गेले आहेत. ते संवाद बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही मनोज मुंतशीर म्हंटले आहे.
'आदिपुरुष'ला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि सर्व वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. चित्रपट त्याच्या मूळ भावनेपासून दूर जाऊ नये. चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम कलेक्शन करत असला तरी प्रेक्षकांच्या भावना कोणत्याही प्रकारे दुखावल्या जाऊ नयेत. म्हणून संवाद बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे निर्मात्यांनी सांगितले.
दरम्यान, याआधीही जेव्हा चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता तेव्हाही प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर या चित्रपटाच्या ग्राफिक्समध्ये बरेच बदल करण्यात आले. यामुळे चित्रपटाचे बजेटही वाढले. त्यानंतर त्याचा ट्रेलर आला तेव्हा त्याला लोकांचे प्रेम मिळाले. मात्र, आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा निर्मात्यांना हा मोठा निर्णय घ्यावा लागला आहे.