आदिपुरुष रिलीज डेट लांबणीवर: प्रेक्षकांचा चांगलाच हिरमोड.
साऊथ सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सॅनन अश्या सुपरहिट कास्ट नंतर 'आदिपुरुष' पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते आणि आजूनही आहेत. ‘तान्हाजी’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असल्याचे समजल्यावर चाहत्यांची उत्सुकता फारच शिगेला पोहोचली आहे. पण गेल्या महिन्यात नवरात्रीच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर रिलीज केला आणि तो पाहून चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला . चाहत्यांची उत्सुकताही निराशेत बदलली . त्यामुळे या टीझरला प्रचंड ट्रोल करण्यात आले. चित्रपटातील रावण आणि हनुमानाचा लूक लोकांच्या फारसा पसंतीस पडला नाही. प्रेक्षकांकडून व्हीएफएक्स सीन्सवरही जोरदार टीका केली गेली. चित्रपटातील कलाकारांची निवड चुकीची असल्याचे सांगून प्रेक्षकवर्गाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना धारेस धरले. रामायणावर आधारित या चित्रपटात इतिहासाशी खेळ करण्यात आल्याची चर्चा केली गेली. ‘आदिपुरुष’ अश्या अनेक नकारात्मक कारणांमुळे चर्चेत असतानाच आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्णय केले आहे. काही कारणास्तव चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. 'आदिपुरुष’ चे दिग्दर्शक ओम राऊत यांनी चित्रपटाच्या नवीन रिलीज डेटबद्दल खुलासा केला आहे .
‘आदिपुरुष’ हा केवळ चित्रपट नाही, तर भगवान श्रीरामावरील आपली भक्ती आणि आपल्या गौरवशाली परंपरेचा इतिहास आणि संस्कृतीशी असलेल्या आपल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. आदिपुरुषच्या निर्मितीशी निगडित लोकांनी आणखी थोडा वेळ देऊन प्रेक्षकांना एक अद्भुत अनुभव दिला पाहिजे. आदिपुरुष आता १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे, संपूर्ण भारताला अभिमान वाटेल असा चित्रपट बनवण्याचा आमचा निर्धार आहे. तुमचा पाठिंबा, प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला या कामकाजासाठी नेहमीच प्रेरणा देत आले आहेत आणि यापुढेही करत राहतील,” असे निवेदनात त्यांनी म्हणून प्रेक्षक वर्गाला दिलासा दिला आहे. ५०० कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या ‘आदिपुरुष’ ला आता १६ जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
‘आदिपुरुष’च्या टीझरला मिळालेला नकारात्मक प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर ओम राऊतच्या चित्रपटावर सोशल मीडियावर जोरदार टीका झाली. टीझरमधील व्हीएफएक्स इफेक्ट्सवरही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे . लोकांची ही नाराजी पाहून निर्मात्यांनी आता व्हीएफएक्सवर नव्याने काम करायचे ठरवले आहे, त्यामुळे ‘आदिपुरुष’ उशिराने प्रेक्षकांच्या भेटीस येईल . हा बिग बजेट चित्रपट हिंदी, तेलुगु, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास भगवान श्री रामची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात रावणाच्या भूमिकेसाठी सैफ अली खान आणि सीतेच्या भूमिकेसाठी क्रिती ची निवड करण्यात आली.आता प्रेक्षकांची इतकी उत्सुकता ताणल्यानंतर काहीतरी जोरदार पाहायला मिळेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले आहे.