अभिनेत्री दीपाली भोसले सय्यदचे सिनेनिर्मितीत पदार्पण
संत सेवालाल यांच्या जीवनकार्याचा वेध घेत सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारा "संत मारो सेवालाल" हा चित्रपट येत्या नवीन वर्षात १३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास आता सज्ज झाला आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली भोसले सैय्यद या चित्रपटाच्या माध्यमातून सिनेनिर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. नुकतेच "संत मारो सेवालाल" या चित्रपटाचे पोस्टर अनावरण राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निर्माती अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद, क्रिएटिव्ह हेड विश्वेश्वर चव्हाण, सेवालाल यांचे पाचवे वंशज महंत जितेंद्र महाराज आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अरुण राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
माँ भवानी फिल्म आणि स्वामी स्टार आर्ट अँड प्रॉडक्शन निर्मित संत मारो सेवालाल या चित्रपटाची निर्मिती दीपाली भोसले सय्यद आणि फिल्मी सितारा प्रॉडक्शनच्या अशोक तुकारामराव कामले यांनी निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अरूण मोहन राठोड, जीतेश राठोड यांनी छायांकन आणि बबली हक यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. आशुतोष राठोड यांनी संत सेवालाल यांची प्रमुख भूमिका साकारली आहे.
दुष्काळ, अडचणीत असलेला शेतकरी या समस्या मांडतानाच "संत सेवालाल" यांचा जीवनपट, त्यांचे कार्य, त्यांनी दिलेला संदेश असे या चित्रपटाचं कथानक आहे. बंजारा समाजासाठी महत्त्वाचा असलेला हा चित्रपट संपूर्ण भारतीय प्रेक्षकांनाही विचार देणारा आहे. चित्रपटाचं पोस्टर अतिशय लक्षवेधी आणि संत सेवालाल यांच्याविषयी कुतूहल निर्माण करणारं असून हा चित्रपट नक्कीच लक्षवेधी ठरणार यात शंका नाही.