अभिनेता सोनू सूदने चुकवला २० कोटी रुपयांचा कर
अभिनेता सोनू सूदने २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कर चुकवला आहे, असं आयकर विभागानं निवेदनात म्हटलं आहे . आयकर विभागाने सलग तीन दिवस त्याच्या मुंबईच्या घरी जाऊन यासंदर्भात शोध घेतला होता. सोनूने परदेशी देणगीदारांकडून क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून २.१ कोटी रुपये गोळा केले असून परदेशी योगदान (नियमन) कायद्याचे उल्लंघन केले आहे, असंही आयकर विभागाकडून सांगण्यात आलंय.
"अभिनेता आणि त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता असलेल्या परिसरात शोध सुरू असताना, करचुकवेगिरीचे पुरावे सापडले आहेत. अनेक बोगस घटकांकडून असुरक्षित कर्जाच्या रूपात सोनूने त्याच्या बेहिशेबी उत्पन्नाचा मार्ग काढला होता. आतापर्यंतच्या तपासात अशा २० नोंदींचा वापर केल्याचं उघड झाला आहे. तसेच संबंधित सर्वांनीचं बोगस नोंदी दिल्याची बाब स्वीकारली आहे. त्यांनी रोख रकमेच्या बदल्यात चेक दिल्याचंही मान्य केलंय. तसेच कर चुकवण्याच्या हेतूने खात्यांच्या पुस्तकात कर्ज म्हणून व्यावसायिक पावत्या छापल्या गेल्या असून त्याचा वापर गुंतवणूक करण्यासाठी आणि मालमत्ता घेण्यासाठी केला गेला आहे." असे आयकर विभागाने सांगितले.
सोनुवरील आरोपांनुसार, करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान गेल्या वर्षी जुलैमध्ये स्थापन केलेल्या त्याच्या ना-नफा सूद चॅरिटी फाउंडेशनने यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत १८ कोटींपेक्षा जास्त देणगी गोळा केली होती. त्यापैकी १.९ कोटी रुपये त्याने लोकांची मदत करण्यासाठी खर्च केले आणि उर्वरित १७ कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात आहेत.