अभिनेते अजिंक्य देव यांनी बाजीप्रभू साकारण्यासाठी केसांना लावली कात्री!
स्टार प्रवाहवर 26 जुलैपासून भेटीला येणाऱ्या 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव (Ajinkya Deo) या मालिकेत 'बाजीप्रभू देशपांडे' यांची भूमिका साकारत असून, ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारण्य़ासाठी त्यांनी केसांना कात्री लावली आहे.
नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. 'जय भवानी जय शिवाजी' ही मालिका या लढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल. अभिनेता भुषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असून, सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडेंच्या भुमिकेत दिसतील. तर, अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.
अभिनयाच्या आजवरच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मी केसांना कात्री लावल्याचं अजिंक्य देव म्हणाले. 'एक अभिनेता म्हणून हा निर्णय घेणं माझ्यासाठी थोडं कठीण होतं. प्रेक्षकांना हा लूक आवडेल का? याची भीती देखील होती. मात्र, माझ्या या नव्या लूकला प्रेक्षकांनी पसंती दिलेली पाहून माझा निर्णय योग्य असल्याचं समाधान आहे. अशी भावना अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली.