रश्मिका मंदानाचा डीपफेक व्हिडिओ बनवणाऱ्या आरोपीला अटक; दिल्ली पोलिसांची कारवाई
साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदानाबाबत गेल्या वर्षी एक गंभीर प्रकरण समोर आलं होतं. तिचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रश्मिकाने तिचा हा डीपफेक व्हिडिओ पाहून दु:ख व्यक्त केलं होतं. यानंतर तिनं सोशल मीडियावर याविरोधात एक मोहीमही सुरू केली होती. रश्मिका मंदान्नाच्या डीपफेक प्रकरणाचा अनेक दिवसांपासून तपास सुरू असून आता या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक करून याप्रकरणावर त्याची चौकशी केली जात आहे.
रश्मिकाच्या डीपफेक या गंभीर प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल केला होता. आता एकाला अटक केल्यानंतर या आरोपीचे आणखी काही सायबर संबंधीचे गुन्हे समोर आले आहेत. या आरोपीनं एका वृद्ध महिलेला देखील डिजिटल पद्धतीनं त्रास दिला होता. IFSO युनिटचे डीसीपी हेमंत तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक प्रोफाइल प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीनेच डीपफेक व्हिडिओ बनवला असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी आरोपीला दक्षिण भारतातून अटक केली असून त्याला दिल्लीत आणण्यात आलं आहे. सध्या त्याची चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे. मागील वर्षी 10 नोव्हेंबर रोजी आयपीसी कलम 465 आणि 459 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66सी आणि 66ई अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन (IFSO) युनिटमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ANI च्या वृत्तानुसार, दोन महिन्यांच्या सखोल तपास आणि डिजिटल फूटप्रिंट्सच्या माध्यमातून पोलीस मुख्य आरोपीपर्यंत पोहोचले. त्यासाठी पोलिसांच्या स्पेशल सेलने IP अॅड्रेसच्या माध्यमातून हा व्हिडीओ सर्वप्रथम कुठे तयार करण्यात आला आणि तो कुठून अपलोड केला, याचा शोध घेतला आणि त्यानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.