फर्स्ट लूकमुळे उत्सुक झालेले प्रेक्षक पोस्टर लाँचमुळे झाले 'आतुर'
दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो 'धग' आणि 'भोंगा'.. त्यांच्या अव्वल चित्रपटांमधली ही दोन अव्वल नावं! त्यामुळेच दर्जेदार चित्रपटांसाठी ओळखले जाणारे शिवाजी लोटन पाटील यांच्या 'आतुर' चित्रपटाचा फर्स्ट लुक लाँच झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची चालवली गेली होती. ६ ऑक्टोबरला चित्रपटाचा फर्स्ट लुक आल्यानंतर त्यावर मराठी चित्रपट रसिकांनी अंदाज बांधायलाही सुरुवात केली होती. पण त्यांना फार काळ प्रतीक्षा करावी लागली नाही. 'आतुर' चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच झालं आणि प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली!
बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी चित्रपटाचं पहिलं पोस्टर लाँच झालं. चित्रपटाच्या पोस्टरवरून सगळ्यात पहिली गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे चित्रपटाचं तगडं कास्टिंग! आत्तापर्यंत हिंदी, मराठी मालिका, जाहिरातींच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री प्रीती मल्लापुरकर या पोस्टरमध्ये सर्वात वर दिसत आहेत. शिवाय खालीही चित्रपटातला एक प्रसंग पोस्टरवर दिसत असून त्यातही त्या पाठमोऱ्या उभ्या आहेत. त्यामुळे त्यांची चित्रपटात प्रमुख व्यक्तिरेखा असणार हे पोस्टरवरून स्पष्ट झालं आहे. त्यांच्याशिवाय पोस्टरवर योगेश सोमण, चिन्मय उदगीरकर, प्रणव रावराणे हेही दिसत आहेत. त्यांचे हावभाव पाहाता त्यांच्या व्यक्तिरेखांविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
येत्या ३ नोव्हेंबरपासून हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. कुणाल निंबाळकर हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत. झेनिथ प्रोडक्शनच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील यांनी तर कथा-पटकथा तेजस परसपाटकी, आनंद निकम व किरण जाधव यांनी लिहिली आहे. दिलीप डोंबे, श्रीपाद जोशी यांनी संवाद लिहिले आहेत. महेश कोरे यांनी चित्रपटाची कला दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. स्वरास यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. आदित्य पवार व संकेत पारखेंनी चित्पटासाठी गाणी लिहिली आहेत. मयुरेश जोशी यांनी चित्रपटासाठी छायांकन केलं असून मोहिनी निंबाळकर यांनी वेशभूषेची जबाबदारी पार पाडली आहे. रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे तर केशभूषा काजल गोयल यांची आहे. निलेश गावंड यांनी संकलन, तर साऊंड ओमकार निकम यांनी केला आहे. चित्रपटासाठी छायाचित्रांची जबाबदारी प्रशांत तांबे यांनी पार पाडली तर रवी दीक्षित यांच्यावर प्रोडक्शनची जबाबदारी होती. हनी साटमकर यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे.
चित्रपटातील प्रसंग...
दरम्यान, पोस्टरमध्ये चित्रपटातला एक प्रसंग दिसत असून त्यात प्रीती मल्लापुरकर पाठमोऱ्या उभ्या असून मागे योगेश सोमण जमिनीवर बसले आहेत. ते घराच्या एका खोलीत असून तिथे बरीच काढलेली चित्रं भिंतीवर किंवा स्टँडवर लावलेली आहेत. त्यामुळे त्या दोघांच्या व्यक्तिरेखांविषयीही अंदाज लावले जात आहेत.