नवीन वर्षात तेजस्विनी पंडितची प्रेक्षकांना अनोखी भेट ; 'बांबू'च्या निर्मितीसोबतच साकारणार मनोरंजनात्मक भूमिका

नवीन वर्षात तेजस्विनी पंडितची प्रेक्षकांना अनोखी भेट ; 'बांबू'च्या निर्मितीसोबतच साकारणार मनोरंजनात्मक भूमिका

बहुगुणी अभिनेत्रीपासून सुरु झालेला तेजस्विनी पंडितचा प्रवास प्रस्तुतकर्तीपर्यंत पोहोचला आणि आता हा प्रवास आणखी पुढे गेला असून आता तिची ओळख एक यशस्वी निर्माती अशी झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बहुगुणी अभिनेत्रीपासून सुरु झालेला तेजस्विनी पंडितचा प्रवास प्रस्तुतकर्तीपर्यंत पोहोचला आणि आता हा प्रवास आणखी पुढे गेला असून आता तिची ओळख एक यशस्वी निर्माती अशी झाली आहे. 'अथांग' सारख्या थरारक आणि सुपरहिट वेबसीरिजची निर्मिती केल्यानंतर आता तेजस्विनी नवीन वर्षात आपली पहिली फिचर फिल्म प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बांबू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि विशेष म्हणजे त्यात तेजस्विनीचीही झलक दिसली. त्यामुळे प्रेक्षकांना डबल धमाका अनुभवायला मिळणार आहे. विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित 'बांबू' चित्रपट येत्या २६ जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून या चित्रपटात अभिनय बेर्डे, वैष्णवी कल्याणकर, पार्थ भालेराव, शिवाजी साटम, अतुल काळे, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाचे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत. तर ‘बांबू’चे लेखन अंबर हडप यांनी केले आहे.

आपल्या पहिल्या चित्रपटाच्या निर्मितीबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ''या टीमसोबत काम करण्याचा अनुभव खूप धमाल होता. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. अभिनेत्री म्हणून काम करताना आपली व्यक्तिरेखा कशी उत्कृष्टरित्या साकारली जाईल, यावर लक्ष केंद्रित केले जाते. मात्र निर्माती म्हणून काम करताना चहूबाजूकडे लक्ष द्यावे लागते. सतर्क राहावे लागते. चित्रपटाचा श्रीगणेशा झाल्यापासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत निर्मात्याची जबाबदारी असते. किंबहुना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. पहिल्या वेबसीरिजच्या निर्मितीचा अनुभव होताच.

त्यामुळे चित्रपट निर्मितीची प्रक्रिया थोडी सोपी गेली. मात्र वेबसीरिज आणि चित्रपटाच्या निर्मितीमध्ये फरक आहे. चित्रपटाची भव्यता अधिक असते. हा एक धमाल चित्रपट आहे. 'बांबू'ची कथा तरुणाईवर आधारित असली तरी हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. कोणत्याही वयोगटातील प्रेक्षकाला हा चित्रपट भावणारा आहे. मुळात या चित्रपटात अत्यंत दिग्गज, संवेदनशील आणि जबाबदार कलाकार आहेत. प्रत्येकाची एक शैली आहे. या चित्रपटात माझीही एक भूमिका आहे, आता ही भूमिका काय आहे, हे जाणून घ्यायला तुम्हाला 'बांबू' पाहावा लागेल.''

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com