आनंद दिघेंच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसाद ओकची मोठी घोषणा
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटावर आधारित धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. प्रेक्षकांचं प्रेम चित्रपटाला लाभल्यानंतर आता चित्रपटाचा पुरस्कारांनीही गौरव होऊ लागला. अभिनेता मंगेश देसाई यांच्या साहील मोशन पिक्चर्सनं आणि झी स्टुडिओजने "धर्मवीर" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण तरडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात प्रसाद ओक, श्रुती मराठे, गश्मीर महाजनी, क्षितिश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अभिजित खांडकेकर, मोहन जोशी, स्नेहल तरडे आदींच्या भूमिका आहेत.
आनंद दिघे यांची काल २१वी पुण्यतिथी आहे. या पुण्यतिथीनिमित्त प्रसाद ओकने खास पोस्ट केली आहे. यात त्याने आनंद दिघेंच्या जीवनावर एक पुस्तक लिहिल्याचे सांगितले आहे. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका पुस्तकाचा फोटो शेअर केला आहे. या पुस्तकावर ‘माझा आनंद’ असे लिहिण्यात आले आहे. त्याने आनंद दिघे यांचा एक जुना फोटोही शेअर केला आहे.
प्रसादने पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मा. दिघे साहेबांना, विनम्र अभिवादन…!!! लवकरच धर्मवीरच्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं “माझा आनंद” हे पुस्तक प्रकाशित होतंय. चित्रपटाइतकंच प्रेम पुस्तकावर सुद्धा कराल हीच आशा..!! जय महाराष्ट्र…!!!”, प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, अक्षर सुलेखन : सचिन गुरव आणि शब्दांकन : प्रज्ञा पोवळे असेही लिहिले आहे. या फोटोला हॅशटॅग देताना त्याने माझा आनंद, मराठी, मराठी पुस्तक असे टॅग दिले आहेत. दरम्यान या निमित्ताने प्रसाद ओकने लेखन क्षेत्रात पदार्पण केल्याचे समजते आहे.