नवाब मलिकांच्या मुलालाही ईडीचे समन्स
महाराष्ट्राच्या राजकाणामध्ये सध्या ईडीचे (ED) धाडसत्र सुरु असून गेल्या बुधवारी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने धाड टाकली होती. त्यानंतर चौकशीसाठी मलिकांना ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आणि सरतेशेवटी आठ तासांच्या चौकशी अंती त्यांना अटक करण्यात आली. यानंतर आता एक मोठी घडामोड समोर येत आहे.
नवाब मलिक ( Nawab Malik ED ) यांच्यावरील कारवाई सध्या सुरु असतानाच त्यांचा मुलगा फराझ मलिक (Faraz Malik) यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून (JJ hospital) डिस्चार्ज मिळाला आहे. सकाळी 10 वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.