देशांतर्गत विमान प्रवास महागला
कामानिमित्त देशांतर्गत प्रवास करणार असाल तर यापुढे प्रवास करणे महागात पडणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत विमान प्रवासात दरवाढ करण्याचा निर्णय घेताला असून नवे दर 1 जूनपासून लागू होतील. देशांतर्गत प्रवासाच्या तिकिटात 13- 15 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. महागाई आणि कोरोना अशा दुहेरी संकटाने त्रासलेल्या जनतेसमोर विमान दरवाढीची आणखी भर पडली.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पन्न घटलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विमान कंपन्यांना मदत होणार आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या आदेशानुसार, 40 मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासाचे साधारण भाडे हे 2,300 रुपये इतके असते. मात्र आता त्यात 13 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने प्रवाशांना 40 मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासासाठी 2600 खर्च करावे लागणार आहेत. 60 मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासासाठी प्रतिव्यक्ती 2,900 रुपयांऐवजी 3,300 रुपये मोजावे लागतील.