Diwali 2024: यंदाची दिवाळी बळीराजासाठी काटकसरीची जाणार?

Diwali 2024: यंदाची दिवाळी बळीराजासाठी काटकसरीची जाणार?

यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तसंच सध्या बाजारात शेतीमालाला मिळत असलेला कमी भाव यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
Published by :
Team Lokshahi
Published on

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलाय. सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे. बाजारपेठेतही खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची झुंबड उडाल्याचं पहायला मिळतंय. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे आकाश कंदिल, पणत्या, फटाके विक्रीसाठी आले आहेत.

मात्र दुसरीकडे याउलट परिस्थिती पहायला मिळतेय. दिवाळी सणानिमित्त दरवर्षी लातूरच्या बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या संख्येने नागरिक गर्दी करतात. दिवाळीनिमित्त कपडे, किराणा, आकाश दिवे, पणत्या यासह इतर साहित्य खरेदी निमित्त लातूरच्या बाजारात दरवर्षी मोठी उलाढाल होते. मात्र यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय तसंच सध्या बाजारात शेतीमालाला मिळत असलेला कमी भाव यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

परिणामी लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिक अद्याप बाजारपेठेत खरेदीसाठी आलेले नाहीत. त्यामुळेच गतवर्षीप्रमाणे यंदा अद्यापही बाजारपेठेत ग्राहकांकडून खरेदीला अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याची माहिती व्यवसायिकांनी दिली आहे.

दिवाळीनिमित्त खरेदी करण्यात येणाऱ्या कपडे, किराणा साहित्य, आकाश कंदील, पणत्या यांच्या किमतीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे शेतमालाला भाव नसल्यामुळे आडत बाजारात शेतमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार कमी प्रमाणात होत असल्याने त्याचा परिणाम ही लातूरच्या किराणा आणि भुसार बाजारपेठेवर झाला आहे. भाव वाढीमुळे खरेदी करताना ग्राहक गरजेपुरतेच खरेदी करत असल्याचं ग्राहकांनी सांगितले आहे.

हि सर्व परिस्थिती पाहता यंदाची दिवाळी बळीराजासाठी काटकसरीची जाणार असल्याचं चित्रं दिसतंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com