Diwali 2024 Vasu Baras: जाणून घ्या वसुबारस सणामागची कथा आणि महत्त्व

Diwali 2024 Vasu Baras: जाणून घ्या वसुबारस सणामागची कथा आणि महत्त्व

हिंदू कॅलेंडरनुसार सोमवार , २८ ऑक्टोबर रोजी अश्विना किंवा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाचा बारावा दिवस म्हणजे वसु बारस. दिवाळीच्या पहिल्या दिवसासह वसु बारस हा सण साजरा केला जाणार आहे
Published by :
Team Lokshahi
Published on

हिंदू कॅलेंडरनुसार सोमवार , २८ ऑक्टोबर रोजी अश्विना किंवा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाचा बारावा दिवस म्हणजे वसु बारस. दिवाळीच्या पहिल्या दिवसासह वसु बारस हा सण साजरा केला जाणार आहे. भारत हा देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे.

वसुबारस साजरी करताना गायीची पूजा कशी करावी:

दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेचं वसुबारस या सणापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. वसुबारस या सणाच्या दिवशी गाय आणि वासरू ह्यांची पूजा केली जाते. गायीच्या पायावर पाणी वाहून गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घातली जाते. वासराची देखील तशाच प्रमाणे पूजा केली जाते. निरांजनाने ओवाळून गायीच्या आणि वासराच्या अंगाला स्पर्श केले जाते. यानंतर गाय आणि वासराला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गायीला प्रदक्षिणा घालून तिच्या पाया पडल्या जातात.

वसुबारस सणाचे महत्त्व:

हिंदू संस्कृतीमध्ये ज्याप्रकारे इतर सणांना महत्त्व आहे त्याचप्रमाणे दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस या सणाला देखील महत्त्व आहे. हिंदू धर्मात गायीला माते म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्त्विक आहे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणे तसेच गाय ही आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करते. शेतीला खत देऊन पौष्टिकत्व देते, त्यामुळे या पूजनाद्वारे गायीच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार केला जातो. या दिवशी गहू, मूग खाल्ले जात नाहीत. तसेच महिला बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात.

वसुबारस सण साजरी करण्यामागे कथा:

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. कामधेनू म्हणजे, शुद्ध पांढरी गाय आहे. देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली, त्यापैकी कामधेनू हे रत्न ही आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची आपतत्त्वात्मक तरंग सक्रिय होऊन ब्रह्मांडात येते आणि या तरंगा विष्णुलोकातील कामधेनू अव‍तरित करते या कारणामुळे गायीची पूजा केली जाते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com