Toolkit : केवळ सत्यावर आधारित बातमी द्या, दिल्ली हायकोर्टाने माध्यमांना सुनावले
टूलकिट प्रकरणी अटक केलेली पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी हिच्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांवर दिल्ली उच्च न्यायालयाने भाष्य केले आहे. या बातम्या सनसनाटी निर्माण करणाऱ्या तसेच पूर्वग्रहदूषित होत्या, असे न्यायालयाने म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनासंबंधी सोशल मीडियावरून पोस्ट करताना टुलकिटचा वापर झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने बंगळुरुमधील 22 वर्षीय दिशा रवीला अटक केली होती. दिशा रवी हिने टूलकिट गुगल डॉक्युमेंट संपादित केले होते आणि ती या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांचा आहे. आता दिशाने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेऊन या प्रकरणाशी सबंधित माहिती लीक केली जाऊ नये तसेच, असत्य माहिती प्रकाशित आणि प्रसारित होऊ नये, असे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात यावे, अशी मागणी केली होती.
त्यावर आज (शुक्रवार) झालेल्या सुनावणीत माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या वृत्तांबद्दल न्यायालयाने भाष्य केले. केवळ सत्यावर आधारित सामग्रीच प्रकाशित आणि प्रसारित होईल, याची काळजी माध्यमांनी घ्यावी. जेणेकरून दिशाच्या विरोधातील चौकशीत अडथळे निर्माण होणार नाहीत. त्याचबरोबर चार्जशिटसंबंधीच्या बातम्याही परस्परविरोधी नसाव्यात, असेही न्यायालयाने सांगितले. ट्विटरवरील पोलिसांच्या पोस्ट हटविण्याचे आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला. पण माहिती लीक होणार नाही, यासंबंधीची काळजी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. या प्रकरणावर 17 मार्चला सुनावणी होईल.