अटी-शर्तीच्या कराराचा भंग करून शेतकरी नेत्यांनी विश्वासघात केला, दिल्ली पोलिसांचा आरोप
लोकशाही न्यूज नेटवर्क
नव्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्ली गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराचे गालबोट लागले. अटी-शर्तींच्या कराराचा भग करून शेतकरी नेत्यांनी विश्वासघात केल्याचा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे.
दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी कायम संयमाचा मार्ग अवलंबला होता. मात्र शेतकरी नेत्यांकडून अटी-शर्तींचे पालन न झाल्याने हिंसाचार उफाळला. या हिंसाचारात 394 पोलीस जखमी झाले असून त्यातील काही आयसीयूमध्ये आहेत. याशिवाय, 30 पोलीस गाड्या आणि 6 कंटेनरचे नुकसान झाले, असे एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले.
लाल किल्ल्यावर फडकावण्यात आलेले झेंडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या ठिकाणी करण्यात आलेले आंदोलन गांभीर्याने घेतले आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचाही वापर करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे, पोलीस कारवाईत एकाचाही मृत्यू झालेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
19 अटकेत, 50 जण ताब्यात
नवी दिल्लीतील हिंसाचार प्रकरणी 25पेक्षा जास्त फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत 19 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, अन्य 50 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.
शेतकऱी नेत्यांची चौकशी करणार असून आवश्यकतेनुसार कठोर कारवाई करणार असल्याचे सांगत, या हिंसाचाराचे व्हिडीओ फूटेज देखील उपलब्ध आहे. फेस रिकग्निजन सिस्टीमद्वारे समाजकंटकांची ओळख पटवून अटकेची कारवाई करण्यात येईल. कोणत्याही समाजकंटकाला सोडणार नाही. यामागे कोण आहे, तेही स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले.
गुप्तचर यंत्रणेत त्रुटी नाही
गुप्तचर यंत्रणेत कुठल्याही प्रकारची त्रुटी नाही. आम्हाला पूर्ण माहिती मिळाली होती. या रॅलीच्या आधी परदेशातून, विशेषत: पाकिस्तानातू 308 बनावट ट्विटर हॅण्डल सक्रिय होते. यावरून लोकांना भडकावण्यात आले. ही माहिती गुप्तचर यंत्रणेमुळेच समोर आल्याचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी सांगितले.