कोरोनीलच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निर्णय

कोरोनीलच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निर्णय

Published by :
Published on

योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजलीने तयार कलेल्या कोरोनील या औषधाच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. या औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. त्याच आधारे या औषधाच्या विक्रीवर महाराष्ट्रात बंदी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले आहे.

पतंजलीने कोरोनील औषध लॉन्च केले तेव्हा केंद्रीय आऱोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावरून आयएमने सवाल उपस्थित केला आहे. अवैज्ञानिक उत्पादनाला आरोग्यमंत्री कसे काय प्रोत्साहन देऊ शकतात? तसेच कोरोनाच्या नियंत्रणासाठी कोणत्याही पारंपरिक औषधाला मान्यता किंवा प्रमाणपत्र दिलेले नसल्याचे डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रीय कार्यालाने स्पष्ट केले असल्याचे आयएमएने म्हटले आहे.

याच्या अऩुषंगाने राज्य शासनाने बंदीचा निर्णय घेतला आहे. डब्ल्यूएचओ, आयएमए तसेच इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण झाल्याशिवाय पतंजलीच्या कोरोनील औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. पतंजलीच्या कोरोनील औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर आयएमएने प्रश्न उपस्थित केले असून डब्ल्यूएचओने सुद्धा हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा चुकीचा दावा फेटाळला आहे. इतक्या घाईने हे औषध बाजारात आणणे आणि दोन ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी याला समर्थन देणे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com