बूस्टर डोस घेऊनही महिला डॉक्टरला कोरोनाची लागण
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार देशात 18 वर्षांखालील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) सुरुवात झाली आहे. तसेच आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्यास देखील सुरुवात होत आहे. देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मात्र असे असतानाही बूस्टर डोस घेतल्या नंतरही वसईत डॉक्टर महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत.
डॉ भक्ती तळेकर असे कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेचे नाव असून त्या वसई विरार महापालिकेच्या माता बाल संगोपन केंद्रात कार्यरत आहेत. 10 जानेवारी रोजी त्यांनी बूस्टर डोस घेतला होता. त्यानंतर 14 जानेवारीला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्दी, ताप, अंगदुखीची लक्षण जाणावल्याने त्यांनी कोरोना रिपोर्ट केला होता. सध्या त्या त्यांच्या राहत्या घरी होम आयसोलेशन मध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ भक्ती चौधरी यांनी माहिती दिली आहे.