‘या’ कारणामुळे राहुल गांधींचं टि्वटर केलं होतं तात्पुरतं सस्पेंड
दिल्लीत बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, त्यांच्यावर कारवाईसाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पीडितेचं वय ९ वर्षे होतं. याचिकाकर्ते मकरंद म्हादलेकर यांनी आरोप केला आहे की राहुल गांधी यांनी जुनेलाईन जस्टीस अॅक्ट आणि POCSO अॅक्टचं उल्लंघन केलं आहे.
राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्यावर भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला. त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ट्विट हटवलं होतं. पण त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं सस्पेंड करण्यात आल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता. परंतु ट्विटरनं दावा फेटाळल्यानंतर अकाऊंट तात्पुरतं लॉक करण्यात आल्याचं काँग्रेसनं म्हटलं होतं.