Bharat Bandh; कृषी कायद्यांच्या विरोधात ‘भारत बंद’ची हाक; शेतकऱ्यांनी केली गाजीपूर सीमा बंद
केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात आज नवी दिल्लीत शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे. या बंदचा फटका रेल्वे, रस्ते तसेच दूध आणि भाजीपाला पुरवठ्याला बसण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने 'भारत बंद'चं आवाहन करत आज भारत बंदची हाक दिली आहे. या आवाहनाला अनेक पक्षांनी पाठिंबा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार, हा बंद सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत असेल. यादरम्यान दुकानं, मॉल आणि संस्था बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने पंजाबमध्ये रेल्वे वाहतूक रोखण्याचा इशारा दिला आहे. त्याशिवाय दूध आणि भाजीपाल्याचा पुरवठाही रोखण्याची धमकी देण्यात आली आहे.
गाजीपूर सीमा आणि NH -24 हायवे बंद
गाजीपूर सीमेवर शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांकडून भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गाजीपूर सीमा बंद करण्यात आली आहे. दिल्ली ते गाझियाबाद दरम्यान गाझीपूर (दिल्ली-उत्तर प्रदेश) सीमेवर एनएच -24 दोन्ही बाजूंनी बंद करण्यात आले आहे.