भारतीय शेअर बाजार बनला जगातील चौथा मोठा स्टॉक मार्केट, हाँगकाँगला टाकले मागे
Indian Stock Market : मार्केट कॅपिटलायझेशनच्या बाबतीत भारतीय शेअर बाजाराने नवा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर, देशांतर्गत बाजारातील कम्बाईंड एक्सचेंजचे लिस्टेड मार्केट कॅप 4.33 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. याबाबतीत भारताने हॉंगकॉंगला मागे टाकले आहे. हाँगकाँगच्या शेअर बाजाराची मार्केट कॅप 4.29 ट्रिलियन डॉलरच्या पातळीवर राहिली.
बीएसईचे मार्केट कॅपिटलायझेशन 3.72 लाख कोटींच्या पुढे गेले होते. सकाळी सेन्सेक्सने सुमारे 450 अंकांच्या वाढीसह सुरुवात केली आणि निफ्टीने 21700 ची पातळी ओलांडताना दिसला. देशाच्या शेअर बाजारासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक मोठी उपलब्धी मानली जाऊ शकते आणि ही बातमी देशांतर्गत गुंतवणूकदारांचा तसेच परदेशी गुंतवणूकदारांचा भारताच्या विकासावर विश्वास दर्शवते.
भारतीय शेअर बाजाराने 5 डिसेंबर 2023 रोजी प्रथमच 4 ट्रिलियन डॉलरच्या मार्केट कॅपच्या ऐतिहासिक शिखराला स्पर्श केला होता. इक्विटी मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या सातत्याने वाढणाऱ्या सहभागामुळे शेअर बाजारातील गुंतवणुकीची व्याप्ती अधिक मजबूत झाली असून शेअर बाजारात एकामागून एक नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळत आहेत.
ब्लूमर्गच्या अहवालानुसार, परदेशी गुंतवणूकदारांसाठी पसंतीचे इन्वेस्टमेंट डेस्टिनेशन बनण्याच्या दिशेने भारतीय शेअर बाजाराने चीनपेक्षा अधिक आकर्षक गुंतवणूक पर्याय म्हणून स्वतःला सादर केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग, भारतीय कंपन्यांचा वाढता व्यवसाय, आयपीओ मार्गाद्वारे कंपन्यांची उत्कृष्ट सूची इत्यादी अनेक देशांतील गुंतवणूकदारांना भारताच्या विकास प्रवासावर विश्वास असल्याचे दर्शवतात.