Budget 2022 | करदाते व शेअर्स गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला
सौरभ गोंधळी | आपल्या भारत देशामध्ये कर भरणाऱ्यांची संख्या आधीच कमी असताना, गेल्या दोन वर्षातील कोरोना काळामुळे कर दात्यांवर जास्तीचा बोजा पडला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या अर्थसंकल्पामध्ये करदात्यांना सरकार काय सवलती देते हे पाहणे महत्त्वाचे राहील. मुख्यत्वे यामध्ये पगारदार वर्ग यांना सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण कोरोनामुळे आधीच खूप जणांचे रोजगार गेले आहेत. काहींचे पगार कमी झाले आहेत, असे असताना स्टॅंडर्ड डिडक्शन ची मर्यादा ५० हजारावरुन ७५ हजार होणार का याची वाट करदाते पाहत आहेत. तसेच या काळामध्ये वर्क फ्रॉम होम ची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. एका अहवालानुसार ६० टक्के लोकांची वर्क फ्रॉम होम ला पसंती आहे. वर्क फ्रॉम होम मुळे वीज बिलामध्ये वजावट मिळणार का? अशीसुद्धा करदात्यांची अपेक्षा आहे.
दुसरीकडे शेअर्स गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून येते. २०१६ मध्ये सामान्य गुंतवणूकदारांची संख्या ही ३३ टक्के होती तर २०२१ मध्ये ही संख्या तब्बल ४५ टक्के एवढी आहे. एका अहवालानुसार २०२०-२१ मध्ये ०१ कोटी ४२ लाख नवे गुंतवणूकदार शेअर्स मध्ये आले आहेत. त्यामुळे शेअर्स गुंतवणुकदारांना कशा स्वरूपाचा दिलासा सरकार देतं हे पाहणे महत्त्वाचे राहील. शेअर्स गुंतवणूकदारांसाठी सिक्युरिटी ट्रांजेक्शन टॅक्स हा रद्द व्हावा किंवा कमी व्हावा अशी अपेक्षा आहे. हा टॅक्स शेअर्सच्या खरेदी विक्रीतून जो नफा मिळवला जातो त्यावर हा कर आकारला जातो. तसेच आभासी चलन अर्थात क्रिप्टो करेंसी ह्यावर सुद्धा सरकारने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक राहील. एकूणच करदाते व शेअर्स गुंतवणूकदार यांच्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा राहील.
देशवासियांसाठी खास सुविधा मिळणार?
सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे, त्यानिमित्ताने येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार खास घोषणा करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सरकार देशामध्ये ७५ हायस्पीड रेल्वे सुरू करणार आहेत. भारतामध्ये रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. त्याला अधिक चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या रस्त्यावर ७५ विस्टाडोम रेल्वे सुरू करण्याची शक्यता आहे. विस्टाडोम म्हणजे ट्रान्सपरंट. ज्याप्रकारे लक्झरी अथवा कार च्या वरचा भाग हा आरपार दिसतो त्या स्वरूपाची सुविधा या रेल्वेचा मार्फत देण्यात येईल.
या अनुषंगाने नवीन ७५ इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट सुरू करण्यात येतील. यामध्ये काही नवीन तर काहींना अपग्रेड केले जाईल. हे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे स्वातंत्र्य लढ्यातील निवडक पंच्याहत्तर ठिकाणी रस्ते, हवाई मार्ग व रेल्वे मार्ग यांच्या चांगल्या स्वरूपाच्या सुविधा देण्यात येईल. ग्रामीण भागाकरिता ७५ गावांना डिजिटल स्वरूप प्राप्त करून देण्यात येईल. तसेच मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर व नवीन नॅशनल हायवे विकसीत करणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकूणच या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पर्यटनासाठी नवीन योजना ही अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम करेल.