टूलकिट प्रकरण : निकिता जेकबला जामीन मंजूर
ग्रेटा थनबर्ग टूलकिटप्रकरणी वकील आणि सामाजिक कार्यकर्त्या निकिता जेकबला ३ आठवड्यांसाठी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. निकिता यांच्याविरोधात दिल्लीमध्ये अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं. निकिताविरोधात आयपीसी कलम १२४ (अ) अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मुंबई उच्च न्यायालयानं निकिता यांना दिलासा दिला आहे. वस्तुस्थिती पाहता या गुन्ह्याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. गुन्हासुद्धा दिल्लीत नोंदवला गेला आहे, असं निरीक्षण न्यायाधीशांनी नोंदवलं आहे.
काय आहे प्रकरण?
प्रजासत्ताक दिनाआधी झूम अॅपद्वारे 'पोएटिक जस्टीस फाऊंडेशन'च्या बैठकीला हजेरी लावल्याची कबुली निकिता जेकब यांनी दिली होती. या बैठकीला खलिस्तानी समजल्या जाणाऱ्या पोएटिक जस्टिस फाऊंडेशन या संघटनेचे संस्थापक धालिवाल यांचीही उपस्थिती होती. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून निकिता जेकबने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयानं निकाल दिला आहे.