पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचं सेवा व समर्पण अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भाजपकडून राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. या निमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या अभियानाचे प्रमुख राज पुरोहित व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा आणि समर्पण अभियानानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचं उदघाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 17 सप्टेंबर रोजी केलं जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीब वर्गाची सेवा करण्याचा विचार प्रत्यक्षात आणला आहे, असं पुरोहित आणि उपाध्ये म्हणाले.
सेवा आणि समर्पण अभियानात सेवा कार्यक्रमांवर भर
सेवा आणि समर्पण अभियानात सेवा कार्यक्रमांवर भर दिला जाणार आहे. प्रत्येक मंडलात दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व उपकरण यांचे वितरण करणे, प्रत्येक जिल्ह्यातील गरीब वस्ती, अनाथाश्रम, रुग्णालये व वृध्दाश्रमांना भेट देऊन फळांचे वाटप करणे, जिल्हा/मंडल स्तरावर आरोग्य तपासणी शिबिर, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत रेशन किटचे वितरण, रक्तदान शिबिर, सर्व मंडलांमध्ये स्वच्छता कार्यक्रम, प्लास्टिक निर्मूलन मोहिम असे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या खेरीज विविध स्वरूपाचे सेवा कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.